Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या भरतीला ‘बेस्ट’चा ‘रेड सिग्नल’

By admin | Updated: May 30, 2015 00:27 IST

बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नवीन कर्मचारी भरती, बढतीला कात्री लावण्याचे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे़

मुंबई : बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नवीन कर्मचारी भरती, बढतीला कात्री लावण्याचे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे़ मात्र हे परिपत्रक कर्मचाऱ्यांसाठी व उपक्रमास मारक ठरणार आहे़ त्यामुळे हे परिपत्रक मागे घेण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली आहे़बेस्टमध्ये चालक, वाहक व चतुर्थश्रेणी कामगारांची सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत़ महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सोमवारी काढलेल्या या परिपत्रकाचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत आज उमटले़ अनेक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बढतीमुळे काम करण्यास हुरूप येतो. चांगले काम करण्याचे प्रोत्साहन प्रशासन काढून घेत असल्याचा संताप शिवसेनेचे सुहास सामंत यांनी व्यक्त केला़ या महिन्याभरात बेस्टचे दोनशे चालक व वाहक निवृत्त होत आहेत़ नवीन भरती न झाल्यास अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढेल़ नागरी सेवेवर याचा परिणाम होईल, अशी भीती काँग्रेसचे शिवजी सिंह यांनी व्यक्त केली़ याची गंभीर दखल घेऊन या परिपत्रकाबाबत महाव्यवस्थापक समितीबरोबर चर्चा करीत नाही, तोपर्यंत यास स्थागिती देण्यात यावी, असे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी दिले़ (प्रतिनिधी)