Join us

भरती घोटाळ्याचा सूत्रधार गजाआड

By admin | Updated: December 4, 2015 02:36 IST

महापालिकेच्या अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या मुख्य पर्यवेक्षकाच्याही गुन्हे शाखेने गुरुवारी मुसक्या आवळल्या. देवजी प्रेमजी राठोड (५७) असे पर्यवेक्षकाचे नाव

मुंबई : महापालिकेच्या अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या मुख्य पर्यवेक्षकाच्याही गुन्हे शाखेने गुरुवारी मुसक्या आवळल्या. देवजी प्रेमजी राठोड (५७) असे पर्यवेक्षकाचे नाव असून तो ‘डी’ विभागात कार्यरत आहे. मुंबई महापालिकेमध्ये अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात येणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगारांच्या भरती घोटाळ्यात बोगस भरती झालेल्या महिला उमेदवार पूनम बाळू जाधव हिच्यासह दलाल कुणाल नागजी जोगदिया यांच्याविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा कक्ष ३ ने पुढील कारवाई करत आणखी दोन गुन्हे दाखल करून पालिकेतील लिपीक दिलीप चौकेकर (४७), शिपाई अनिल कांजी बारिया (३२) यांच्यासह दलाल सनी विनोद विंजुडा आणि कुणाल नागजी जोगदिया यांना बुधवारी अटक केली. दंडाधिकारी न्यायालयाने चारही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यापाठोपाठ अटकेच्या भीतीने अर्धांगवायूचा झटका आल्याचे नाटक करणाऱ्या राठोडच्याही गुरुवारी मुसक्या आवळण्यात आल्या. भरती प्रक्रियेदरम्यान बोगस उमेदवारांच्या कागदपत्रांवर राठोड सह्या करत होता. त्याच्या सह्यांमुळे ३०० पेक्षा अधिक बोगस उमेदवारांची भरती झाली. हे रॅकेट बोगस उमेदवारांकडून प्रत्येकी २ ते ९ लाखांपर्यंत पैसे उकळत होते. गुन्हे शाखेच्या सर्व १२ कक्षांकडून पालिकेच्या २६ वॉर्डांतर्गत गेल्या पाच वर्षांत भरतीची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)