मुंबई : वर्षभरापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई विद्यापीठ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याचाच एक भाग म्हणजे मुंबई विद्यापीठात यंदा विक्रमी प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुंबई विद्यापीठाची पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची अर्ज प्रक्रिया आॅनलाइन सुरू असून गुरुवारी संध्याकाळपर्यंत तब्ब्ल ४,३०,४३१ विद्यार्थ्यांनी १०,८२,४९० अर्ज केले आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करताना एक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतो. अर्जाची संख्या आतापर्यंतची सगळ्यात जास्त संख्या असल्याने प्रवेशही मागील वर्षीच्या तुलनेत जास्त होणार असल्याचे नक्की आहे. त्यामुळे यंदा मुंबई विद्यापीठ प्रवेशांचा आपलाच विक्रम मोडीत काढणार असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.यंदा प्रथमच पदव्युत्तर प्रवेश आॅनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. आॅनलाइन नोंदणीची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत होती, मात्र ज्या महाविद्यालयांत जागा उपलब्ध असतील त्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले. त्यामुळे पुढेही या प्रवेशांत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवेशपूर्व नोंदणीमध्ये वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमांकरिता नोंदणी सर्वाधिक आहे. तर सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमासाठी झालेली नोंदणीही जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी विक्रमी नोंदणी; ४,३०,४३१ विद्यार्थ्यांनी केले १०,८२,४९० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 05:57 IST