Join us
Daily Top 2Weekly Top 5

पांढ-या कांद्यांचे वाड्यात यंदा विक्रमी उत्पादन

By admin | Updated: April 7, 2015 05:23 IST

जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन होत नाही, मात्र वाड्यातील चांबळे, डाकिवली येथील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पांढऱ्या कांद्याचे विक्रमी उत्पादन

वाडा : जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन होत नाही, मात्र वाड्यातील चांबळे, डाकिवली येथील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पांढऱ्या कांद्याचे विक्रमी उत्पादन घेऊन कांद्याची शेती यशस्वी केली आहे.आयुर्वेदात औषधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, थंड गुणधर्म असणाऱ्या पांढऱ्या कांद्याला उन्हाळ्यात पसंती दिली जाते. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पांढऱ्या कांद्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ठाणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये याचे तुरळक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, वाडा तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पांढऱ्या कांद्यांच्या उत्पादनात अव्वल ठरले आहेत. वज्रेश्वरीपासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या या गावांना तिन्ही बाजूंनी तानसा नदीचा किनारा लाभला आहे. पांढऱ्या कांद्याचे रोप हे वसई तालुक्यातील अर्नाळा या भागातून आणावे लागते.एक एकरमधून ८ ते १० टन उत्पादन पांढऱ्या कांद्याचे मिळते. त्यासाठी ३० ते ३५ हजार रुपयांचे रोप लागले. फवारणीसह हा सर्व खर्च एकरात अंदाजे ६० ते ८० हजार रुपये येतो. पांढऱ्या कांद्याला १५ ते २० रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने एकरी दीड लाखापर्यंत उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शहरात पांढऱ्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्याने हा कांदा दलालांमार्फत विकला जातो.येथील शेतकऱ्यांनी भातपिकाला पर्याय म्हणून पांढऱ्या कांद्याची शेती यशस्वी केली आहे. मात्र, सरकारच्या कृषी खात्याकडून त्यांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची येथील शेतकऱ्यांची खंत आहे. मजुरांची कमतरता, खते, औषधांचा तुटवडा या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी पांढरा कांदा उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकिक कायम राखला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून वाडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी आम्ही करत आहोत. परंतु, ती पूर्ण होत नसल्याने उत्पादन केलेल्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत शेतकरी सदाशिव पाटील, लडकू शेलार यांनी व्यक्त केली.