Join us  

अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणार हिमालय पुलाची पुनर्बांधणी; साडेसात कोटी रुपये खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 2:47 PM

१४ मार्च २०१९ रोजी हा पादचारी पूल कोसळून मोठी दुघर्टना झाली होती.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील हिमालय पादचारी पुलाच्या बांधकामाला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी ठेकेदाराची निवड करण्यात आली आहे. हा पूल पुरातन वास्तू परिसरातील असल्याने सर्व परवानगी घेतल्यानंतर आता पुनर्बांधणी केली जाणार आहे. मात्र नवीन पुलासाठी महापालिकेला तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

१४ मार्च २०१९ रोजी हा पादचारी पूल कोसळून मोठी दुघर्टना झाली होती. या दुघर्टनेमध्ये सात पादचारी रेल्वे प्रवाशांचा मृत्यू तर ३३ जण जखमी झाले होते. या पुलाचे योग्यप्रकारे ऑडिट न करता तो वापरास खुला करुन दिल्यामुळे, ऑडिटर डी.डी. देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच पूल विभागचे सेवानिवृत्त प्रमुख अभियंता व निवृत्त उपप्रमुख अभियंता यांच्यासह इतर अभियंत्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 

हा पादचारी पूल रेल्वे प्रवाशांसाठी सोयीचा होता. या पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांना येता-जाता प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्याची  मागणी होत आहे. तसेच या पुलाअभावी डी. एन. रोडवरही वाहतूक कोंडी निर्माण होत होती. अखेर दोन वर्षांनंतर या पुलाच्या पुनर्बांधणीचे कंत्राट पिनाकी इंजिनिअर्स  अँड डेव्हलपर्स यांना देण्यात येणार आहे. पावसाळा वगळून १५ महिन्यांमध्ये या पुलाची उभारणी केली जाणार आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका