Join us  

धोकादायक सात पुलांची पुनर्बांधणी, ९५ कोटींचा खर्च; आठ महिन्यांत होणार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 2:55 AM

पूर्व व पश्चिम उपनगरातील सात पूल अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. या पुलांवरुन वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे पर्यायी व्यवस्थेअभावी वाहतुकीवर ताण पडत आहे.

मुंबई : धोकादायक पुलांच्या यादीतील आणखी सात पुलांच्या पुनर्बांधणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ९५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, वाहतूक विभागाने हिरवा कंदील दाखविल्यानंतरच या कामाला सुरुवात होणार आहे. लवकरच आचारसंहिता जाहीर होणार असल्याने पुलांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

पूर्व व पश्चिम उपनगरातील सात पूल अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. या पुलांवरुन वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे पर्यायी व्यवस्थेअभावी वाहतुकीवर ताण पडत आहे. त्यामुळे या पुलांची लवकरात लवकर पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सातही पुलांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र या पुलांचे काम एकत्र हाती घेतल्यास मुंबईत वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होऊ शकते. त्यामुळे वाहतूक विभागाच्या परवानगीनंतरच कामाला सुरुवात होणार आहे. हे काम आठ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. कंत्राट देताना तशी अट ठेकेदारांना घातली जाणार आहे.

हे आहेत ते सात पूलवांद्रा पूर्व येथील हन्सभुर्ग पाइपलाइनजवळील पूल - पाच कोटी ३० लाख ८७ हजार ६१६ रुपये, वांद्रे- पश्चिम जुहूतारा रोड एनएनडीटी महाविद्यालयसमोर- १५ कोटी ३४ लाख २८९२ रुपये, अंधेरी पूर्व धोबीघाट मजास नाले पूल - सहा कोटी ९८ लाख ३१ हजार ६२७ रुपये, अंधेरी पूर्व मजास नाल्यावरील मेघवाडी जंक्शन पूल-चार कोटी ३८ लाख १५०४ रुपये, गोरेगाव पश्चिम पीरामल नाला, इन-आॅर्बिट मॉलजवळ २६ कोटी २६ लाख ६० हजार २६ रुपये, मालाड लिंकरोड डी-मार्टजवळील पूल २२ कोटी ९० लाख ९० हजार ११० रुपये, बोरीवली रतन नगर, दहिसर नदी पूल-१४ कोटी २३ लाख ४९ हजार १०२ रुपये.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका