Join us  

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्ती वयाचा पुनर्विचार, पंकजा मुंडे यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 5:37 AM

अंगणवाडी कर्मचा-यांचे सेवासमाप्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे करण्याच्या आदेशाचा पुनर्विचार करू, असे आश्वासन महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

मुंबई : अंगणवाडी कर्मचा-यांचे सेवासमाप्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे करण्याच्या आदेशाचा पुनर्विचार करू, असे आश्वासन महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत बुधवारी घेतलेल्या बैठकीदरम्यान मुंडे यांनी हे आश्वासन दिले. सोबतच १ एप्रिल २०१८ पासून कर्मचाºयांना ५ टक्के मानधनवाढ देण्याबाबतही निर्णय जाहीर करण्याचे त्यांनी आश्वासित केले.मुंडे म्हणाल्या की, अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवासमाप्ती वयावर सामान्य प्रशासन विभागासोबत चर्चा करून पुनर्विचार करण्यात येईल. बँकखाते आधारसंलग्न नसल्याने, राज्यातील ६ हजार २२२ सेविकांचे मानधन जानेवारी २०१८ पासून रोखण्यात आले आहे. त्यांना मार्च २०१८ सालापर्यंत जुन्या पद्धतीने मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी इमारतींच्या थकीत भाड्यासंदर्भात मुंडे यांनी वित्तविभाग, महिला व बालविकास विभागाच्या सचिव स्तरीय बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. कृती समितीचे नेते एम. ए. पाटील म्हणाले, सेवासमाप्तीचे वय कमी करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी, कृती समितीने सरकारला ८ दिवसांची मुदत दिली आहे. शिष्टमंडळात कृती समितीच्या वतीने, एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे आदींचा समावेश होता.>...तर २७ मार्चपासून आंदोलन!सकारात्मक चर्चेमुळे २० मार्चपासून मुंबईत होणारे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत वयोमर्यादेचा निर्णय घेतला नाही, तर २७ मार्च रोजी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीच्या नेत्या शुभा शमीम यांनी दिला आहे.

टॅग्स :पंकजा मुंडे