Join us  

म्हाडाच्या सोडतीतील घरांच्या किमतींचा पुनर्विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 7:38 AM

मधू चव्हाण यांची मागणी : अध्यक्षांना पत्र लिहून दिला घरचा अहेर

अजय परचुरे 

मुंबई : म्हाडाच्यामुंबई मंडळाच्या १,३८४ घरांसाठीची लॉटरी पुढच्या महिन्यात १६ डिसेंबरला फुटणार आहे. मात्र याही वर्षी म्हाडातील घरांच्या महागड्या किमतींमुळे मुंबईकरांना ऐन थंडीतही घाम फुटला आहे. म्हाडाच्या या महागड्या घरांवरून टीका सुरू असताना आता त्यात भर पडली ती म्हाडाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांची. चव्हाण यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना पत्र लिहून लॉटरीतील अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरांच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी कमी करण्याची मागणी करून म्हाडाला घरचा अहेर दिला.

म्हाडा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात मधू चव्हाण यांनी उदय सामंत यांना म्हाडाच्या घरांच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असल्याने किमतींबाबत अध्यक्षांनी तातडीने पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे. म्हाडाने या वर्षी घरांच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी केल्या असल्या तरी या किमतींत घर घेणे हे अल्प, अत्यल्प गटातील लोकांना परवडणारे नाही. त्यामुळे घरांना जास्त प्रतिसाद मिळवायचा असेल तर मध्य, अल्प आणि अत्यल्प गटातील घरांच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी कमी कराव्यात, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

म्हाडाच्या किमती वर्षानुवर्षे वाढत चालल्या आहेत. या वर्षी तर म्हाडाच्या गँट रोड येथील घरांची किंमत ५ कोटींच्या घरात आहे. मागील लॉटरीत लोअर परळमधील घरे म्हाडाने १ कोटी ९५ लाख रुपयांना विक्रीसाठी आणली. ही किंमत परवडणारी नसल्याने बहुतांशी घरे लॉटरी विजेत्यांनी म्हाडाला परत केली. हा इतिहास ताजा असूनही म्हाडाने या वर्षी महागडी घरे विक्रीसाठी आणली. त्यामुळे त्यांनी पुनर्विचार करून किमती कमी कराव्यात अशी मागणी चव्हाण यांनी केली. म्हाडाचे मुंबई अध्यक्ष असलेल्या चव्हाण यांनी किमती कमी करण्याचा जो घरचा अहेर दिला आहे त्यावर म्हाडा अध्यक्ष उदय सामंत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :म्हाडामुंबई