मुंबई : २००२ हिट अॅण्ड रन केसप्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची उच्च न्यायालयाने सुटका केली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपिलात जाण्याची शिफारस सरकारी वकिलांनी राज्य सरकारकडे केली आहे.सर्वोच्च न्यायालयात अपिलात जाण्यासाठी ही केस योग्य आहे, असे मत नोंदवत गृह खात्याला गुरुवारी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य सरकारी वकील संदीप शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने प्रस्तावात काय म्हटले आहे, ते सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यास मुख्य लक्ष्य सलमानचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील याची साक्ष असणार आहे. सत्र न्यायालयाने समलानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावताना रवींद्र पाटीलच्या साक्षीचा आधार घेतला. तर उच्च न्यायालयाने पाटीलची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे म्हणत सलमानची सुटका केली. सत्र न्यायालयाने कायदेशीर बाबी लक्षात न घेता शिक्षा सुनावली, असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे. तसेच आता सरकार सर्वोच्च न्यायालयात गेल्यास हे प्रकरण पुन्हा चर्चेत येणार आहे. (प्रतिनिधी)
सलमानप्रकरणी अपीलात जाण्याची शिफारस
By admin | Updated: December 19, 2015 02:04 IST