Join us

काळाची गरज ओळखून वैद्यकीय संशोधन विभाग पुनर्जीवित करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:08 IST

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात एन. आय. व्ही.च्या रूपाने व्हायरॉलॉजी ...

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात एन. आय. व्ही.च्या रूपाने व्हायरॉलॉजी लॅब कार्यरत असून, ती उत्तम काम करत आहे. कोविड-१९चा विषाणू हा सतत म्युटेट होत आहे. आतापर्यंत २७हून अधिकवेळा तो म्युटेट झाला आहे. बी.१.१.७ हा व्हेरिअंट व्हायरस सध्या ब्रिटन व इतर युरोपियन देशात धुमाकूळ घालत असताना पुन्हा दक्षिण आफ्रिकेत या व्हायरसचा वेगळा प्रकार सापडत आहे. यावर सतत अभ्यास विदेशी देशात होत आहे. आपल्याकडेदेखील रिसर्च विभाग आहे. त्याला खऱ्या अर्थाने पुनर्जीवित करून रिसर्चचे काम व्हायरॉलॉजी आणि बॅक्टरॉलॉजीमध्ये सुरू व्हावे, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयाच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात कॅथलॅब प्रपोज असूनही अजून सुरू झालेली नाही. यासाठी आपण थोडा पुढाकार घेतला तर गरीब रुग्णांना अँजिओग्राफी-प्लॅस्टीसाठी केईएम रुग्णालयात जावे लागणार नाही. तसेच केईएम येथील हृदयक्रिया प्रलंबित राहणार नाही.

पश्चिम उपनगरात ही सुविधा सुरू केल्यास अनेक हृदयरोगतज्ज्ञ ही सेवा नाममात्र शुल्कावर देण्यास तयार होऊ शकतात. कारण कूपर रुग्णालयात सर्व सेटअप तयार असून, ही सुविधा सुरू करण्यासाठी आपण थोडा प्रयत्न करावा, अशी विनंतीसुद्धा या पत्राद्वारे डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

---------------------------