लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्यामध्ये जंगलांमध्ये झाडांचे प्रमाण अधिक वाढते. अशावेळी बिबट्या बाहेर सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने तो मनुष्य वस्तीमध्ये कुत्र्यांच्या शोधात आल्याचे निदर्शनास येते. मुळात वस्त्यांमध्ये किंवा या वस्त्यांलगत बिबट्याचा वावर कधीच थांबला नव्हता. ऋतुमानाप्रमाणेदेखील बिबट्यांचा वावर होत असतो. मात्र आता भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आणि कचरा कमी केला तर नक्कीच मनुष्यवस्तीमधील बिबट्याचा वावर कमी होईल, असे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक आयुक्त वन्यजीव डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.
गोरेगाव येथील ज्या सोसायटीच्या आवारात बिबट्या निदर्शनास आला ती वस्ती किंवा तेथील लगतच्या वस्त्या या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच आहेत. त्यामुळे या वस्त्यांमध्ये हा किंवा या वस्त्यांलगत बिबट्याचा वावर कधीच थांबला नव्हता. ऋतुमानाप्रमाणेदेखील बिबट्यांचा वावर होत असतो. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. शैलेश पेठे म्हणाले की, पावसाळ्याचा विचार करता बिबट्याच्या हालचाली येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शनास येतात. यात काही फार बदल झालेले नाहीत. मात्र ज्या सोसायटीच्या परिसरात निदर्शनास आला तेथे आम्ही सातत्याने जनजागृतीचे कार्यक्रम केले आहेत. येथे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. आम्ही जेव्हा येथे जनजागृती केली तेव्हा त्यांना दोन उपाय सुचवले होते. पहिला म्हणजे महापालिकेच्या मदतीने येथील कचरा कसा कमी होईल याकडे लक्ष द्या. आणि दुसरा उपाय म्हणजे महापालिकेच्या मदतीने येथील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून घेण्यात यावे. आज येथे मोठ्या प्रमाणावर भटके कुत्रे आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर जेवढा अधिक तेवढाच बिबट्याचा वावरदेखील अधिक असणार आहे.
पावसाळ्यामध्ये जंगलांमध्ये झाडांचे प्रमाण अधिक वाढते. अशावेळी बिबट्या बाहेर सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने तो मनुष्य वस्तीमध्ये कुत्र्यांच्या शोधात आल्याचे निदर्शनास येते. उद्याना लगत आपण जरी मोठ्या भिंती बांधल्या तरी बिबट्या त्याहूनदेखील सहज मनुष्यवस्तीमध्ये प्रवेश करू शकतो. तो झाडांचा आधार घेऊनदेखील येथे येऊ शकतो. आता ज्या भिंती बांधलेल्या आहेत त्या भिंतीवरूनदेखील तो चालताना आपल्या निदर्शनास येतो. परिणामी यावर एक उपाय म्हणजे येथील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण कमी करणे अथवा त्यांचे निर्बीजीकरण करणे होय. येथील कचरा कमी करणे हा एक उपाय होय. येथील परिसरामध्ये मोठे हॅलोजन लावणे हा आणखी उपाय होय. कोणी कोठे अतिक्रमण केले या विषयावर मी बोलणे उचित राहणार नाही. मुंबईसारख्या परिसराला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यासारखे जंगल लाभले आहे म्हणून आपण भाग्यवान आहोत आणि येथे एकूण ४७ बिबटे आहेत. त्यामुळे अधिकाधिक उपाय योजने यावर आपण भर दिला पाहिजे, असेही डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.