Join us

रियालिटी चेक : ई पास तपासणीला कुठे ब्रेक तर कुठे पोलीस ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत कडक निर्बंध लागू करीत आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पास बंधनकारक करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत कडक निर्बंध लागू करीत आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पास बंधनकारक करण्यात आले आहेत. अशात, पोलिसांकड़ून ठिकठिकाणी नाकाबंदी करीत याची तपासणी होत आहे. मात्र दुपारच्या सुमारास या तपासणीला काहीसा ब्रेक लागत असल्यामुळे काही मंडळी बाहेर पडण्यासाठी ही वेळ निवडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी पोलीस दिवसभर ॲक्शन मोडवर असल्याचेही पाहावयास मिळाले आहे.

‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत होते. पोलिसांकड़ून कलर कोडिंग सिस्टीम लागू करण्यात आली. मात्र त्याचाही नागरिक ग़ैरफ़ायदा घेऊ लागल्यामुळे पोलिसांवर ताण वाढला. अशात अवघ्या आठवड्याभरात याचा गाशा गुंडाळावा लागला. त्यातच २२ एप्रिलपासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. अशा २३ एप्रिलपासून प्रवासासाठी ई पास बंधनकारक करण्यात आले आहेत. यापूर्वीही ई पास बंधनकारक करण्यात आला होता.

वाशी, दहिसर, मुलुंड पूर्व, आनंदनगर टोलनाका, पश्चिमेकडे लालबहादूर शास्त्री मार्गावरील टोलनाका तसेच ऐरोली अशा पाच ठिकाणी टोलनाके (मुंबई एंट्री पॉइंट) आहेत. त्यांपैकी वाशी व ऐरोली टोलनाक्यावर फारशी गर्दी होत नाही. मात्र मुलुंड व दहिसर टोलनाक्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दहिसर टोलनाक्यावर गुजरात, राजस्थान तसेच उत्तर भारतातून वाहने येतात. त्याचबरोबर पालघर, वसई-विरार तसेच घोडबंदर रोड येथूनही वाहने मुंबईत प्रवेश करतात; तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश तसेच पश्चिम महाराष्ट्रातून वाशी, ऐरोली व्हाया ठाण्याला जाणारी वाहने मुलुंड आनंदनगर टोलनाक्याचा वापर करतात. यात प्रवासी तसेच मालवाहू वाहनांचा समावेश असतो. त्याशिवाय मुंबई आणि परिसरातील वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे अशा ठिकाणी कारवाई अधिक कठोर करण्याची आवश्यकता आहे.

....

१. मुलुंड चेकनाका

मुंबईतून ठाण्यात आणि ठाणे येथून मुंबईत येणाऱ्या मुलुंड चेकनाका येथील टोलनाका परिसरात सकाळपासून सुरू असलेली वाहनांची तपासणीची गती दुपारच्या सुमारास संथ होताना दिसून आली. काही मंडळी याचा फायदा उठविताना दिसून आली. मात्र सायंकाळच्या सुमारास पुन्हा पोलिसांकड़ून तपासणीचा वेग वाढवत ई पासबाबत चौकशी करण्यात आली. तसेच मुलुंड पूर्वेकडील आनंदनगर टोलनाक्यावर ठाणे येथून मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुचाकीसह चारचाकी वाहनांना अडवून पोलिसांकड़ून चौकशी करण्यात येत होती.

.....

ऐरोली टोलनाका

नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ऐरोली टोलनाका परिसरात दुपारच्या सत्रातही पोलीस ॲक्शन मोडवर असल्याचे पाहावयास मिळाले. यात दुचाकीसह चारचाकी वाहनांना अडवून त्यांची कसून चौकशी होताना दिसून आली. यात अनेक मंडळी रुग्णालयात नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगत पळ काढण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र कागदपत्रांशिवाय त्यांना पुढे जाऊ देण्यात आले नाही. तर काहीजणांना पोलिसांनी ई पासअभावी माघारी धाडले.

....

दहिसर टोलनाका

दहिसर येथील टोलनाक्यावर दुपारच्या सत्रात लॉकडाऊन आहे, असे वाटतच नाही. मुंबई महापालिकेचे कर्मचारी येथे उपस्थित नाहीत. मुंबई पोलिसांचे कर्मचारी येथे उपस्थित नाहीत. टोलनाक्यावर ज्या पद्धतीने तपासणी व्हावी तशी ती होत नाही. टोल घेण्याचे काम मात्र नेहमीप्रमाणे सुरू असले तरी जिल्ह्यातून येणारी आणि जिल्ह्यातून बाहेर जाणारी वाहने सहज येथून जाताना दिसली. मात्र लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीने इ-पासबाबत कार्यवाही होणे अपेक्षित आहे, असे येथे कोठेही होताना आढळले नाही. अशा पद्धतीने प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित राहिली तर कोरोनाची घटलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढेल, अशी भीती पश्चिम उपनगरात वास्तव्यास असलेले विनोद घोलप यांनी व्यक्त केली.

......

विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे

मुंबईत २३ तारखेपासून ई पास बंधनकारक करण्यात आला. त्यात २३ तारखेला अवैध वाहतूक केल्याप्रकरणी २ गुन्हे तर विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध १२५ गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ई पासअभावी अनेकांना माघारी पाठविण्यात आले.

.....

पोलिसांच्या दिमतीला विशेष पोलीस अधिकारी

अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे शक्य नसल्यामुळे मुंबई पोलिसांच्या दिमतीला विभागानुसार स्थानिकांमधून निवडलेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांची फ़ौजदेखील तैनात असल्याचे पाहावयास मिळाले. मुंबईत एकूण अकराशे विशेष पोलीस अधिकारी तैनात आहेत.