Join us  

पाकला वळसा घालून गाठली मुंबई; कुवेती बोटीतील तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 1:00 PM

कुवेती बोटीतील तिघांना अटक, कुलाबा पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईची सागरी सुरक्षा भेदून कुवेतमधून विनापरवाना बोटने गेट वे ऑफ इंडियाला पोहोचलेल्या तीन कामगारांविरुद्ध कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पासपोर्ट न बाळगता अवैधरीत्या भारतात प्रवेश केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ही बोट कुवेत येथून सौदी अरेबिया, कतार, दुबई सीमेच्या बाजूने पुढे मस्कत, ओमन करीत पाकिस्तान सीमेजवळून मुंबईत आल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. मात्र, जीपीएसद्वारे पोलिस त्यांच्या नेमक्या मार्गाचा शोध घेत आहेत.

इन्फंट विजय विनोद अँटोनी (वय २९), निडीसो डिटो (३१) आणि सहाया अँटोनी अनीश (२९) अशी तीन मच्छिमारांची नावे आहेत. तिघेही कन्याकुमारी येथील रहिवासी आहेत. 

तीन दिवसांची पोलिस कोठडी  तीनही जण दोन वर्षांपूर्वी कुवेत येथे बोटीवर कामाला गेले होते. मात्र तेथील मालक त्यांना ना वेतन देत होता, ना जेवण. त्यांना मारहाणही करत होता. तसेच, त्या व्यक्तीने पासपोर्टसुद्धा काढून घेतले. काम एक वर्षाचेच आहे असे खोटे सांगून प्रत्यक्षात दोन वर्षे थांबवून घेतल्याने तिकडून मायदेशी परत येणे तिघांनाही कठीण झाले होते. त्यामुळे या तिघांनी संधी साधून मालकाची बोट घेत मुंबई गाठल्याचा दावा पोलिसांकडे केला आहे.  मात्र कुवेतचे मालक अब्दुल्लाह शराहित यांच्या मालकीची फिशिंग बोट विनापरवाना घेऊन आंतरराष्ट्रीय सीमा पार केली. तसेच, पासपोर्ट जवळ न बाळगता अवैधरीत्या भारतात प्रवेश केला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  तिघांनाही अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

बोटमालकाचीही चौकशी?कुवेतचे मालक अब्दुल्लाह शराहित यांनाही चौकशीसाठी बोलाविण्याच्या दृष्टीने पोलिस हालचाली सुरू आहेत.   फिशिंगसाठी जातो सांगून गाठली मुंबई...कामगारांनी भारतीय दूतावास तसेच कुवेत येथील फागील पोलिस स्टेशनकडे तक्रार केल्याचे सांगितले. मात्र त्याचे पेपर मिळालेले नाहीत. मात्र त्यातून काहीच मदत न मिळाल्याने त्यांनी मालकाला फिशिंगसाठी जातो सांगून २६ जानेवारी रोजी मालकाकडून ६ हजार लिटर डिझेल भरून घेतले. २८ जानेवारी रोजी ते कुवेत येथून निघाले. प्रवासादरम्यान कुणाला भेटले?      तीनही मच्छीमार नेमक्या कुठल्या मार्गाने आले?  आरोपींच्या जीपीएस ट्रॅकर तपासणीद्वारे त्यांनी सांगितलेल्या प्रवासादरम्यान ते कोणास भेटले का?       प्रवासादरम्यान किंवा कुवैत येथे त्यांनी काही गुन्हा केला आहे का?, बोटीने अन्य कोणी संशयित येत होते का?  त्यांनी अन्य मालमत्ता वाहतूक करून किंवा आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काही गुन्हा केला आहे का? या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :मुंबईपाकिस्तानबोट क्लब