Join us
Daily Top 2Weekly Top 5

होम क्‍वारंटाईन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:11 IST

दिवसातून सहा वेळा कॉल; घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल, पालिका प्रशासनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सांताक्रुझ येथील हॉटेलमधून ...

दिवसातून सहा वेळा कॉल; घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल, पालिका प्रशासनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सांताक्रुझ येथील हॉटेलमधून चार प्रवाशांनी पलायन केल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे लक्षणे नसल्याने होम क्‍वारंटाईन असणाऱ्या बाधित रुग्णांवर आता महापालिकेचे लक्ष असणार आहे. अशा रुग्णांच्या हातावर पूर्वीप्रमाणे शिक्का मारण्यात येणार आहे. तसेच अशा व्‍यक्तींना दिवसातून पाच ते सहा वेळा फोन करून ते घरी असल्‍याची खातरजमा केली जाणार आहे. मात्र त्यांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

मुंबईत सध्या ५ हजार ९४३ बाधित रुग्ण असून यापैकी १,७२३ रुग्णांमध्येच लक्षणे आहेत. तर लक्षणे नसलेले ३,९६३ रुग्ण आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित ८१ हजार ८३८ नागरिक सध्या होम क्‍वारंटाईन आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्ण, संशयित लोकांनी अनुक्रमे १४ दिवस व बाधित नसल्याचा अहवाल येईपर्यंत सात दिवस क्‍वारंटाईन होणे बंधनकारक आहे. मात्र काही रुग्ण हा नियम मोडून घराबाहेर पडत असल्याचे समोर आले आहे.

यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका असल्याने महापालिकेने कडक नियम लागू केले आहेत. त्यानुसार बाधित व्‍यक्तींची योग्‍य माहिती ठेवून त्‍यांच्‍या नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्तींचेही विलगीकरण केले जाणार आहे. तसेच लक्षणे नसलेल्या रुग्‍णाचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण होण्‍याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्‍याची माहिती सोसायट्यांनी महापालिकेच्‍या वॉर्ड वॉर रुमला कळवावी, अशी सूचना पालिकेने केली आहे.

................................

सक्तीने क्‍वारंटाईन करणार....

पालिकेचे नियम मोडून घराबाहेर पडलेल्या बाधित रुग्णाबाबत तक्रार आल्यास विभाग स्तरावरील वॉर रुममार्फत अशा रुग्‍णांवर गुन्‍हे दाखल केले जाणार आहेत. तसेच अशा रुग्‍णांना सक्‍तीने संस्‍थात्‍मक विलगीकरण (इन्‍स्‍ट‍िट्यूशनल क्‍वारंटाईन) येथे ठेवले जाणार असल्याचा प्रशासनाने इशारा दिला आहे.

ब्राझिलमधून येणाऱ्यांचे संस्‍थात्‍मक विलगीकरण...

मुंबई विमानतळावर ब्राझिलमधून येणाऱ्या प्रवाशांना सक्‍तीने सात दिवसांच्‍या संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍यात येणार आहे.