Join us

रवींद्र कुलकर्णींनी स्वीकारला प्र-कुलगुरूचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 05:00 IST

नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला

मुंबई : नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते प्र-कुलगुरू (प्र.) डॉ. विष्णू मगरे यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना प्र-कुलगुरू पदाचा पदभार सोपविला. २२ जून रोजी राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी डॉ. कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केली होती.व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, माळवते प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागातील शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.कुलगुरू पेडणेकर म्हणाले की, मावळते प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या सहकार्याची व मार्गदर्शनाची विद्यापीठाला नेहमी गरज असेल. डॉ. कुलकर्णी यांच्या दीर्घ संशोधनाचा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार संशोधन, नॅक, रँकिंग या प्रक्रियेतील अनुभवाचा विद्यापीठाला नक्कीच फायदा होणार असून इंडस्ट्री-एकेडेमिया रिलेशनमध्ये विशेषज्ञ म्हणूनही त्यांचा फायदा विद्यापीठाला होईल. बदलत्या काळानुसार विद्यापीठाने जोमाने काम करून सहभाग आणि सर्व स्तरावरील सहकायार्तून विद्यापीठ मार्गक्रमण करेल, असेही ते म्हणाले.यावेळी रवींद्र कुलकर्णी म्हणाले, मुंबर्ई विद्यापीठासारख्या ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी नियुक्ती होणे हे अभिमानास्पद आहे. विद्यापीठाला ज्ञानदानाची १६० वर्षांची उज्ज्वल, ऐतिहासिक आणि समृद्ध परंपरा आहे. विद्यापीठाने ज्ञानदानाचा हा वारसा अविरतपणे जोपासला असून ही प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. सहकार्यातून कार्यसंस्कृती रुजविता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.