Join us

रत्नागिरीची अस्मिता पोवार ‘फाईव्ह स्टार शेफ’

By admin | Updated: August 28, 2015 23:23 IST

ती मुंबईच्या केटरिंग कॉलेजमध्ये शिक्षिकाही आहे. या क्षेत्राकडे मुलींनी यावे, यासाठी तिचे प्रयत्न होऊ लागले आहेत. या क्षेत्रात मुली आल्या तर अधिक चांगल्या तऱ्हेने काम करू शकतील,

शोभना कांबळे -रत्नागिरी  स्त्रिया फक्त चूल आणि मूल कुशलतेने सांभाळू शकतात, असे म्हणणाऱ्या पुरूषवर्गाने त्याच स्वयंपाकघराशी निगडीत असलेला ‘शेफ’ प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात पुरूषांची मक्तेदारी वाढू लागली आहे. परंतु ही मक्तेदारी मोडीत काढत रत्नागिरीची कन्या अस्मिता पोवार हिने मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.शहरातील राम आळी येथील नागरिक अशोक पोवार यांची अस्मिता ही कन्या. लहानपणापासून स्वयंपाकाची आवड होतीच. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात बारावी केल्यानंतर मनाशी निश्चय पक्का होता, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं. वडील अशोक पोवार, आई वंदना पोवार तसेच तिच्या बहिणींनी तिच्या या निर्णयाचा आदर करीत तिला मुंबईला प्रवेश घेऊन दिला. नातेवाईकांकडे राहून अस्मिताने हा अभ्यासक्रम पूर्ण करीत चांगल्या मार्कांनी पदवी संपादन केली. आवडीचा विषय असल्याने तिने अगदी मनापासून यातील कौशल्ये आत्मसात केली. तिसऱ्या वर्षी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये येणाऱ्या विविध विभागांपैकी कोणता निवडावा, हा प्रश्न अस्मिताला पडला नाही. तिने ठरवल्याप्रमाणे ‘बेकरी’ विभाग निवडला. अभ्यासक्रम पूर्ण होताच तिला नोकरीची प्रतीक्षा करावी लागली नाही. काही दिवसांतच मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. हे हॉटेल नुकतेच सुरू झाले होते. अस्मिताला अनुभवासाठी तर ही पर्वणीच वाटली. या हॉटेलच्या भव्य अशा किचनमध्ये पन्नास जणांपैकी महिला शेफ म्हणून अस्मिता एकटीच होती. कळवा येथे राहणाऱ्या अस्मिताला पहाटे पाच वाजता घरातून निघावे लागे आणि रात्री किती वाजता घरी जायला मिळेल, हे सांगता येत नसे. हॉटेल पूर्ण वेळ सुरू झाल्यानंतर मात्र, तिला बेकरी विभागात शेफ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. साडेतीन वर्षे तिने या विभागात काम केले. काम करताना इतर क्षेत्रात मुली मुलांबरोबर वावरतात, मग या क्षेत्रात यायला मुली का घाबरतात, असा प्रश्न तिला पडत असे. तिने निर्णय घेतला, मुलींना या क्षेत्राकडे आणण्यासाठी आपण प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यासाठी ती मुंबईच्या केटरिंग कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणूनही काम करीत आहे. त्यामुळे आता या क्षेत्राकडे मुलींनी यावे, यासाठी तिचे प्रयत्न यशस्वी होऊ लागले आहेत. या क्षेत्रात मुली आल्या तर अधिक चांगल्या तऱ्हेने काम करू शकतील, असा तिचा ठाम विश्वास आहे.