हुसेन मेमन, जव्हारजव्हार तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांचे तसेच इतर नागरीकांचे रेशनकार्ड मागणीचे अर्ज वर्षानुवर्षे धुळ खात पडून आहेत. परंतु, कुंभकर्णी निद्रेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झोप अद्याप उघडलेली दिसत नाही. पिंपळशेत (गावठाण) येथील रहिवासी रामदास त्रिंबक तुंबडा यांने १३ डिसेंबर २०१३ ला रेशनकार्ड जीर्ण झाल्याने नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी अर्ज केला होता, परंतू अद्याप रामदासचे नवीन रेशनकार्ड मिळालेले नाही. याबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता कर्मचारी ‘नंतर या, उद्या या’ असे उत्तर देत असल्याचे रामदास तुंबडा यांनी सांगितले. गरीब जनतेकडून पैसे लुटण्यासाठी हि नाटके केली जात असल्याचे आरोपही येथील नागरीक करीत आहेत. रेशनकार्ड विभक्त करणे, जिर्ण झालेले रेशनकार्ड नवीन बनवणे, फाटलेले रेशनकार्ड नवीन बनवणे, रेशनकार्ड नव्याने काढणे असे शेकडो अर्ज तहसील कार्यालयात रोज येतात, परंतु, ज्यांनी पैसे दिले त्यांचे काम एका दिवसात, आणि ज्यांनी नाही दिले त्यांना मात्र वर्ष की दोन वर्षे...त्याचा काहीच नेम नाही. तहसीलदारांनी याची गंभीर दखल घेऊन रामदास तुंबडा सारख्या हजारो बांधवांचे रखडलेले रेशनकार्ड त्वरीत द्यावे अन्यथा विविध संघटनांमार्फत आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी येथील आदिवासी बांधवांनी केली आहे.
रेशनकार्डांचे अर्ज वर्षापासून धूळखात
By admin | Updated: December 16, 2014 22:53 IST