Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूत रक्तस्राव झालेल्या महिलेवर दुर्मीळ शस्त्रक्रिया

By संतोष आंधळे | Updated: May 24, 2024 22:21 IST

कूपरमधील मेंदुविकार तज्ज्ञांची कामगिरी.

मुंबई : सततच्या डोकेदुखी व उलट्यांमुळे त्रस्त झालेली ५९ वर्षीय महिला उपचारासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय कूपर रुग्णालयात दाखल झाली होती. वैद्यकीय तपासणीत या महिलेच्या मेंदूतील रक्तधमनीचा फुगा फुटल्याने मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर, रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने अत्याधुनिक पद्धतीने दुर्मीळ शस्त्रक्रिया करत या महिलेस जीवदान दिले.

डोकेदुखीची तक्रार करणाऱ्या महिलेच्या आजाराचे निदान व्हावे, म्हणून सीटी स्कॅन करण्यात आले. त्यात रुग्ण महिलेच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचे आढळून आले. रक्तवाहिन्या स्पष्टपणे दिसण्यासाठी करण्यासाठी ‘डिजिटल सब्स्ट्रक्शन अँजिओग्राफी’ या फ्लुरोस्कोपी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यात या महिलेच्या मेंदूतील रक्त धमनीचा फुगा फुटल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले.

अन्युरिझम हा एक धमनीचा विकार आहे. ज्यामध्ये धमनीचे आवरण किंवा भिंत कमकुवत होते आणि धमनी फुटून रक्तस्राव होऊ शकतो. संपूर्ण निदानानंतर या रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मेंदू विकार (न्युरोलॉजी) तज्ज्ञांनी घेतला. ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ या उपकरणाच्या साहाय्याने आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलेच्या रक्तामध्ये गुठळी होऊ नये, म्हणून अस्पिरीन किंवा तत्सम औषधे देण्याची गरज लागत नाही. रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ.प्रद्युम्न ओक, डॉ.मनीष साळुंखे, डॉ.अबू ताहिर यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ.अनिता शेट्टी, औषधवैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ.नीलम रेडकर, सहायक प्राध्यापक डॉ.दीप रावळ यांचे सहकार्य लाभले.

या शस्त्रक्रियेविषयी माहिती देताना अधिष्ठाता डॉ.शैलेश मोहिते म्हणाले की, ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ या उपकरणाच्या साहाय्याने भारतात झालेली ही ११वी शस्त्रक्रिया आहे, तर मुंबई महानगरात मेंदुविकार तज्ज्ञांनी केलेली अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. 

टॅग्स :मुंबई