Join us

कर्करोगग्रस्त २५ वर्षीय रुग्णावर दुर्मीळ ‘पेल्विक बोन’ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:13 IST

अखेर मेटल प्रोस्थेसिसने या तरुणाला नव्या आयुष्याची संजीवनी दिली.

मुंबई : मुंबईतील २५ वर्षांच्या कर्करोगग्रस्त तरुणाच्या पेल्विक हाडांमध्ये ट्युमर आढळला होता. पाय कायमच गमवावा लागेल, अशी भीती या तरुणाच्या मनात निर्माण झाली. बऱ्याच डॉक्टरांकडे उपचारांसाठी फिरूनही पदरी निराशा आली. काही डॉक्टरांनी पेल्विक हाडच काढावे लागेल, असाही सल्ला दिला. अखेर मेटल प्रोस्थेसिसने या तरुणाला नव्या आयुष्याची संजीवनी दिली.रुग्णाच्या पेल्विक हाडामध्ये ट्युमर आहे, त्यासाठी निओ अ‍ॅडजवन्ट केमोथेरपी करावी लागेल. त्यानंतर, सर्जरी आणि नंतर अ‍ॅडजवन्ट केमोथेरपी हेच उपचार उपलब्ध आहेत. हाडांचे कर्करोग तसे दुर्मीळ असतात. पेल्विक बोन म्हणजेच हिप जॉइंट, शरीराला आधार देणारे मुख्य हाड, ज्याच्या आजूबाजूला अनेक महत्त्वाची हाडे, अवयव असतात आणि त्यामध्ये ट्युमर निर्माण झाल्यास पायाला अजिबात इजा न होऊ देता, तो काढून टाकणे हे कॅन्सर सर्जन्ससमोरील खूप मोठे आव्हान असते. काहीही करून आपला पाय वाचावा, यासाठी तो अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आॅथोर्पेडिक आॅन्कोलॉजीच्या बाह्यरुग्ण विभागात आला.याविषयी, डॉ. हिमांशू रोहेला यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या टीमने रुग्णासाठी विविध पर्यायांचा अभ्यास केला. कर्करोगग्रस्त पेल्विक हाड काढून त्या जागी एलजेनिक ग्राफ्ट लावावे लागते. हे ग्राफ्ट ताजे गोठविलेले असणे आवश्यक असते, पण भारतात दाता मिळत नसल्यामुळे ताजे गोठविलेले ग्राफ्ट उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे, यामध्ये ग्राफ्ट फ्रॅक्चर होण्याचादेखील धोका संभवतो. नवीन पर्याय म्हणून पेल्विक हाड काढून त्या जागी पेल्विसचे थ्रीडी रिकन्स्ट्रक्टेड मेटल प्रोस्थेसिस बसविणे, सोबत हिप जॉइंट बदलणे, सर्जरीच्या आधी व नंतर केमोथेरपी हे उपचार करण्याचे ठरले. रुग्णाच्या शरीराच्या आकारमानानुसार बनविण्यात आलेले पेल्विक प्रोस्थेसिस हाडाच्या समस्याग्रस्त भागात बरोबर बसू शकते आणि पेल्विसला त्याच्या मूळ रूपात रिकन्स्ट्रक्ट करू शकते. रुग्णाच्या शरीरानुसार आॅस्टिओटॉमी गाइड असल्यामुळे आॅस्टिओटॉमी अचूकता लक्षणीय प्रमाणात सुधारते.या रुग्णाचे एक्सरे आणि एमआरआय पाहून डॉ. रोहेला आणि त्यांच्या टीमने केसमध्ये थ्रीडी ई-प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून नावीन्यपूर्ण सर्जिकल उपचार करण्याचे ठरविले. इम्प्लान्टची रचना करण्यासाठी थ्रीडी ई-प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हाडातील ट्युमर यशस्वीरीत्या काढून त्या जागी कस्टम मेड प्रोस्थेसिसचे एक्सइज्ड पेल्विक बोन बसविण्यात आले.

टॅग्स :मुंबई