Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देत विवाहितेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:28 IST

कफ परेड परिसरातील घटना : पैशांसाठी आरोपीच्या पत्नीनेच काढले व्हिडीओ

मुंबई : शीतपेयातून गुंगीचे औषध देत विवाहितेवर बलात्कार केला. याच दरम्यान आरोपीच्या पत्नीने त्याचा व्हिडीओ आणि फोटो काढले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत, पैसे उकळत दोन वर्षे विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना कफ परेडमध्ये उघडकीस आली आहे. अत्याचाराला कंटाळून महिलेने पैसे देणे बंद करताच विकृत दाम्पत्याने ते व्हिडीओ महिलेसह तिच्या पतीच्या मोबाइलवर पाठविले. अखेर या महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, पण हा गुन्हा अधिक तपासासाठी पायधुनी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

रंजीत चौधरी आणि ऊर्मिला चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. ४० वर्षीय तक्रारदार विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार, महिलेचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. २०१६मध्ये चौधरी दाम्पत्याने कांदे, बटाटे खरेदीच्या बहाण्याने ओळख केली. दोघांनी तिचा विश्वास संपादन केला. व्यवहाराच्या बहाण्याने गाडीतून सोबत जात असताना शीतपेयातून महिलेला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर, त्यांनी एका गेस्ट हाउसमध्ये या महिलेवर बलात्कार केला. त्याच दरम्यान आरोपीच्या पत्नीने फोटो आणि व्हिडीओ काढले. पुढे हेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत, विवाहितेकडून १ लाख ८० हजार रुपये उकळले.

या व्हिडीओच्या आधाराने तिच्यावर दोन वर्षे बलात्कार होत होता. २०१८ पर्यंत तिने अत्याचार सहन केला. त्यानंतर, तिने पैसे देणे बंद केले. याच रागात चौधरी दाम्पत्याने ते व्हिडीओ आणि फोटो विवाहितेच्या पतीच्या मोबाइलवर पाठविले. अखेर घडलेला प्रकार पतीला समजताच दोघांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. कफ परेड पोलिसांनी धमकी, खंडणी, बलात्कार यांसारखे गुन्हा दाखल करत दोघांचा शोध सुरू केला आहे. हा गुन्हा पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने अधिक तपासासाठी हा गुन्हा पायधुनी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :बलात्कार