मुंबई : भांडुप येथे आपल्या घराबाहेर खेळत असलेल्या एका ९ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून नाहूर येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे बालिकेची प्रकृती बिघडली असून, तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही. भांडुप सोनापूर परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारी ९वर्षीय सोनू (नाव बदललेले आहे) शुक्रवारी रात्री ८च्या सुमारास घराबाहेर खेळत होती. बराच वेळ होऊनही ती दिसून न आल्याने घरच्या मंडळींनी तिचा शोध सुरू केला. अखेर न सापडल्याने त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, रात्री ११च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एका नागरिकाने दूरध्वनी करून नाहूर स्टेशनजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मुलगी रडत असल्याचे कळविले. त्यानंतर थोड्या वेळात नवघर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिला ताब्यात घेत जखमी असल्याने अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. भांडुप पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता ती सोनू असल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती बिघडल्याने तिला सायन रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत अज्ञात इसमाविरोधात अपहरण, बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मुलुंडमधील बालिकेचे अपहरण करून बलात्कार
By admin | Updated: November 29, 2015 02:50 IST