Join us  

राव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षाकोंडी! अर्ज सादर करण्यासाठीची मान्यता नसल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 4:14 AM

बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांचे संबंधित महाविद्यालयांतून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता केवळ अभ्यासाची तयारी सुरू आहे.

मुंबई : बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांचे संबंधित महाविद्यालयांतून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता केवळ अभ्यासाची तयारी सुरू आहे. मात्र मुंबई, ठाण्यातील राव महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी आपण परीक्षा देऊ शकणार की नाही या प्रश्नाने चिंतित आहेत. बारावीची परीक्षा तोंडावर आली तरीही महाविद्यालयाच्या मान्यतेच्या तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्यामुळे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक अनुक्रमांक नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली.महाविद्यालयात शिकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून पालक संघटना व शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत.आय.आय.टी. राव कनिष्ठ महविद्यालयाच्या मुंबई व ठाण्यात शाखा असून यामध्ये १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी २०१८-१९ साठी अकरावीकरिता प्रवेश घेतला आहे. यंदा बारावीची परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होत आहे. सदर परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी राज्यमंडळाने मुदत वाढवून दिली असून विविध महाविद्यालये विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करीत आहेत. मात्र मंडळाकडे अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक अनुक्रमांक अद्याप या कनिष्ठ महाविद्यालयाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे मिळालेला नाही. त्यामुळे मुदत संपत आली तरी या महाविद्यालयात शिकत असलेल्या आणि बारावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप मंडळाकडे सादर करण्यात आलेले नाहीत. यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतित असून प्रचंड तणावाखाली आहेत. हे महाविद्यालय इंटिग्रेटेड असल्याने याला मान्यता मिळणार की नाही, असा सवालही आता त्यांच्याकडून उपस्थित होत असून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती पालकांना वाटू लागली आहे.पुढील आठवड्यात अर्ज स्वीकारण्याचे आश्वासनया संदर्भात युवासेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई उपसंचालक कार्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा जाब विचारल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. या विद्यार्थ्यांची इतर महाविद्यालयांतून नोंदणी करून परीक्षा अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश उपसंचालकांनी द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर उपरोक्त कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना करून पत्र मागविले असून पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यात येतील, असे आश्वासन उपसंचालक अहिरे यांनी दिल्याची माहिती सावंत यांनी दिली.राज्य मंडळाला निवेदन देणार : संबंधित प्रकरणी त्या त्या विभागाच्या शिक्षण निरीक्षकांकडून पत्रे मागविण्यात आली आहेत. ही पत्रे आल्यानंतर उपसंचालक कार्यालयाकडून राज्य मंडळाला यासंदर्भात निवेदन दिले जाईल. विद्यार्थ्यांना विविध केंद्रांवरून परीक्षा देण्याची मुभा मिळेल याची परवानगी घेतली जाईल.- राजेंद्र अहिरे, उपसंचालक, मुंबई उपसंचालक विभाग

टॅग्स :परीक्षाशिक्षण क्षेत्र