ठाणे : परमारप्रकरणी ठामपाचे चार नगरसेवक अडकले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नगरसेवकासह चौघांनी तब्बल तीन कोटी रु पयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात अद्याप कोणाला अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. घंटाळीतील तक्रारदार रजनीनाथ गोविंद पाटसकर (७४) हे व्यवसायाने आर्किटेक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्र ारीत, कावेसर घोडबंदर सर्व्हे नंबर १८४ हिस्सा नंबर १, २, ३ येथे सलीम सिद्दमिया शेख याने स्वत:च्या आणि इतर २७ हिस्सेदारांच्या अविभक्त मालकीची जागा १९९७ मध्ये विकसित करण्यास दिली होती. २००६ मध्ये त्या हिश्श्यातील ३४ गुंठे जमीन नोटरी करून रामराव गुराला याला विकली. त्यानंतर यातील तीन गुंठे जागा रामराव याने प्रदीप भुरके याला विकली असल्याची खोटी कागदपत्रे तयार केली. त्याआधारे काँग्रेसचे नगरसेवक नारायण पवार यांनी ३ कोटी रु पये खंडणी मागगितल्याचा पाटसकरचा आरोप आहे. त्यापैकी ३ लाख रुपये त्यांनी स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर, उर्वरित रक्कम न दिल्याने त्यांनी मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच विविध न्यायालयात केसेस दाखल करून बांधकामात अडथळा आणून बांधलेली बिल्डिंग भुईसपाट करेन व चांगला धडा शिकवेन, अशी धमकी दिली. तसेच इमारत पूर्ण होऊनही वापर परवाना मिळू दिला नाही, असे सांगून पाटसकर यांनी शुक्रवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे नगरसेवक पवार यांच्यासह सलीम शेख, रामराव गुराला आणि प्रदीप भुरके यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बी.एस. तांबे (गुन्हे) हे करीत आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेस नगरसेवकासह चौघांवर खंडणीचा गुन्हा
By admin | Updated: December 6, 2015 00:35 IST