जयेश शिरसाट - मुंबई ड्रगमाफिया बेबी पाटणकरसोबत घनिष्ठ संबंधांशिवाय आरोपी सुधाकर सारंग, यशवंत पार्टे यांनी कारवाईच्या नावाखाली शहरात आरंभलेल्या खंडणीसत्र आरंभले होते. छोट्यामोठ्या तस्करांच्या घरी धाडी घालायच्या, त्यांच्याकडील अंमलीपदार्थ घ्यायचे आणि अटक न करण्याच्या बदल्यात खंडणीही उकळायची, या पद्धतीने पार्टे व सारंग यांनी अवघ्या आठ महिन्यांमध्ये एक ते दीड कोटी रुपये जमवले होते. या खोट्या कारवायांमध्ये दोघांसोबत एका महिलेचाही समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.सारंग अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या कांदिवली युनिटमध्ये नेमणुकीस होता. त्याने अंमलीपदार्थ तस्करांची, छोट्यामोठ्या विक्रेत्यांची माहिती देणाऱ्या खबऱ्याला हाताशी धरून शहरातील विशेषत: पश्चिम उपनगरातील नायजेरियन तस्करांची निवासस्थाने, अड्डे शोधून काढले. एकेक करून त्याने या तस्करांच्या, विक्रेत्यांच्या घरांवर, अड्ड्यांवर धाडी घालण्यास सुरुवात केली. या धाडींमध्ये सारंगने अंमलीपदार्थविरोधी पथकाशी काडीचाही संबंध नसलेल्या आणि विशेष शाखेत नेमणुकीस असलेल्या पार्टेला सोबत घेतले. या कारवायांमधून त्यांनी लाखो रुपयांचा अंमलीपदार्थांचा साठा पकडला. त्यापैकी काही हस्तगत करण्यात आला. मात्र उर्वरित साठा त्यांनी विकल्याचा संशय आहे. इतक्यावरच न थांबता या दोघांनी अटक न करण्यासाठी तस्कर, विक्रेत्यांकडून कोट्यवधींची खंडणी उकळली. मात्र अलीकडेच सारंग व पार्टेचे प्रताप अंमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश कांदिवली युनिटच्या प्रमुखांना दिले. दोनेक दिवसांपूर्वीच या दोघांच्या कारवायांचा अहवाल चव्हाण यांच्या हाती पडल्याची माहिती मिळते. दरम्यान, सुरुवातीला या अवैध कामासाठी ज्या खबऱ्याने मदत केली त्यालाच या दोघांनी फसविले. या खबऱ्याच्या हाताखालच्या छोट्या खबऱ्यांना हाताशी धरून सारंग, पार्टे या दोघांनी कोट्यवधींची खंडणी उकळली, अंमलीपदार्थ विकले, अशी माहिती मिळते. बहुतांश कारवायांमध्ये या दोघांसोबत एक खासगी महिलाही उपस्थित असे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पार्टेची पत्नी पूर्वाश्रमी गोरेगाव आणि आसपासच्या परिसरात अंमलीपदार्थांची विक्री करे. या कारवायांमध्ये उपस्थित महिला पार्टेची पत्नी असावी, असा संशय व्यक्त होत आहे.च्ड्रगमाफिया शशिकला उर्फ बेबी पाटणकरच्या नावाखाली अटक झालेले पाच पोलीस अधिकारी-कर्मचारीच अंमलीपदार्थांचा धंदा करत होते, असा दाट संशय गुन्हे शाखेला आहे. त्यानुसार गुन्हे शाखा या पाचही अधिकाऱ्यांची कसून चौकशी करणार आहे. सोबत त्यांचे मोबाइल फोन, फोन रेकॉर्डची झाडाझडती होणार आहे.च्आज गुन्हे शाखेने आरोपींना न्यायालयात हजर केले तेव्हा गुन्हे शाखेकडून हा संशय न्यायालयात व्यक्त करण्यात आला. याशिवाय अंमलीपदार्थांच्या व्यवसायात हे अधिकारी भागीदार आहेत का, बेबीच्या धंद्यात आणखी कोणता पोलीस किंवा खासगी व्यक्ती सहभागी आहे याचाही तपास केला जाईल, असे गुन्हे शाखेने न्यायालयाला सांगितले. माणिकपूरच्या मध्यस्थीचीही होणार चौकशीमाणिकपूर पोलिसांनी एमडी गुन्ह्यात ड्रगमाफिया शशिकला उर्फ बेबी पाटणकरचा मुलगा गिरीशचा शोध सुरू केला होता. ही माहिती मिळताच आरोपी पोलीस सुधाकर सारंग व यशवंत पार्टे यांनी माणिकपूर पोलीस ठाणे गाठून गुन्ह्यातून गिरीशचे नाव वगळण्याची तेथील अधिकाऱ्यांना विनंती केली होती. या मध्यस्थीत दोघांनी माणिकपूर पोलिसांना लाचही देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माणिकपूर पोलिसांनी या दोघांना तेथून हाकलून लावले होते, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. आता पार्टे व सारंग यांच्या अटकेनंतर त्यांचा पाटणकर परिवार व त्यांच्या अंमलीपदार्थांच्या धंद्याशी संबंध किती व कसा हे स्पष्ट करण्यासाठी गुन्हे शाखा माणिकपूर ठाण्यात घडलेल्या त्या प्रकाराची चौकशी करणार आहेत. पोलिसांचे गुन्हे महाराष्ट्र पोलीस कायदा, कलम १४५(२)पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या गुन्ह्याची, त्यात सहभागी आरोपींची माहिती लपवणे व आरोपीला फरार होण्यास सहकार्य करणे. या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांची शिक्षा व दंडाची तरतूदअंमलीपदार्थविरोधी कायदा, कलम ५९(१)कर्तव्यात कसूर करणे. अंमलीपदार्थ बाळगणारा आरोपी ताब्यात असल्यास त्याला सहकार्य करणे. यासाठी १० ते २० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.अंमलीपदार्थविरोधी कायदा, कलम २७(अ) गुन्ह्यातील आरोपीला पळवून लावणे, अटक टाळण्यासाठी धडपड.
ड्रग्जतस्करांकडून उकळली कोट्यवधींची खंडणी
By admin | Updated: May 31, 2015 02:04 IST