Join us  

रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण 20 नोव्हेंबरला, बाबा पार्सेकर आणि निर्मला गोगटे पुरस्काराचे मानकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 6:08 PM

ज्येष्ठ नेपथ्यकार  बाबा पार्सेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री-गायिका निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार 20 नोव्हेंबर रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे आयोजित सोहळयात प्रदान करण्यात येणार आहे.

मुंबई - ज्येष्ठ नेपथ्यकार  बाबा पार्सेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री-गायिका निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार 20 नोव्हेंबर रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे आयोजित सोहळयात प्रदान करण्यात येणार आहे. बाबा पार्सेकर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार व श्रीमती निर्मला गोगटे यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि ५ लाख रुपये असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

२० नोव्हेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे सायंकाळी ७.३० वाजता आयोजित एका विशेष सांस्कृतिक सोहळयात यापूर्वीचे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ रंगकर्मी  लीलाधर कांबळी व  रजनी जोशी यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार  गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर आणि आमदार मनीषा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने दोन्ही पुरस्कारार्थींच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा रंगवेध ! हा कार्यक्रम प्रथितयश कलावंत सादर करणार आहेत. डॉ. गिरीश ओक, सुमुखी पेंडसे, स्मिता तांबे, सीमा देशमुख, शुभा गोडबोले, मेधा गोगटे जोगळेकर, राहुल मेहेंदळे, समीर दळवी, मकरंद पाध्ये, ऋचा पाध्ये, भक्ती रत्नपारखी आणि अरविंद पिळगांवकर हे कलाकार नाट्यगीते व नाट्यप्रवेश सादर करतील. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन श्रीनिवास नार्वेकर यांचे आहे. तसेच संगीत मार्गदर्शक म्हणून कौशल इनामदार असून साथसंगत मकरंद कुंडले, धनंजय पुराणिक, अमित पाध्ये आणि रक्षानंद पांचाळ करणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.