Join us  

आदर्श गावांतही रंगला निवडणुकीचा आखाडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 3:08 AM

ग्रामपंचायत निवडणूक । आरोप- प्रत्यारोपांनी ढवळून निघाली गावे

गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. जाहीर प्रचार संपला असला तरी वैयक्तिक गाठीभेटी सुरूच आहेत. शुक्रवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. प्रचाराच्या निमित्ताने गावे ढवळून निघाली आहेत. भाऊबंदकी उफाळून आली असून, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. प्रचारात यंदा वेगवेगळे तंत्र वापरले जात आहे. त्यात सोशल मीडियाचा वापर अधिक वाढलाय. आदर्श म्हणविणाऱ्या अन् वर्षानुवर्षे बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांतही निवडणूक लागली आहे. महाराष्ट्रातील काही गावांचा फेरफटका मारत ‘लोकमत’ने ग्रामपंचायत निवडणुकीचे रंग टिपले आहेत.

मोबाईल संदेश बहुतांश उमेदवारांनी मोबाईलवरील मेसेजचे पॅकेज खरेदी केले आहे. एकाच वेळी मतदारांना हे लिखित संदेश व व्हाईस कॉल पाठविले जातात. प्रचाराच्या ऑडिओ व व्हिडिओ सीडीदेखील बनवून घेण्यात आल्या आहेत. गावपातळीवरील तरुण हे काम कमी पैशांत करतात. 

डीपी ठेवलाय का बघा भो....काही उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांना मोबाईलवर आपला डीपी व निवडणूक चिन्ह ठेवायला सांगितले आहे. एखाद्याने आपला डीपी ठेवला असेल तर तो आपला पक्का समर्थक आहे, हे उमेदवार ओळखतो. कुणीकुणी डीपी ठेवला आहे, हे आवर्जून तपासतात.

एलईडी स्क्रीनप्रचारात अनेक गावांमध्ये एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. मागील काळात केलेल्या कामांची माहिती या स्क्रीनच्या आधारे दिली जात आहे. ‘लोहसर’ या आदर्श गावचे सरपंच अनिल गीते यांनी सांगितले की, अनेक उमेदवार आपला लेखाजोखा या स्क्रीनच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत आहेत. अनेक उमेदवारांनी चित्ररथ देखील तयार केले आहेत. 

तुफान आलंया, विजयी भव : अनेक उमेदवारांनी ऑडिओ व व्हिडिओ सीडी तयार करताना गाण्यांचा वापर केला आहे. त्यात ‘तुफान आलंया’, ‘दे धक्का’, ‘विजयी भव’ या गाण्यांची मोठी चलती आहे. 

 

 

टॅग्स :मुंबईनिवडणूक