येस बँकेचा संस्थापक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनी लॉड्रिंगप्रकरणी आरोपी असलेला येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याचा जामीन अर्ज सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळला.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात ईडीने राणा कपूरला अटक केली. दिवाण हाउसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल) ला कर्ज मंजूर केल्यामुळे राणा कपूर याची पत्नी व तीन मुली चालवत असलेल्या कंपनीला डीएचएफएलने ६०० कोटी रुपये दिले. या सर्व गैरव्यवहाराची चौकशी ईडीने केली. या प्रकरणी राणा कपूर, त्याची पत्नी व तीन मुली आरोपी आहेत.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात विशेष न्यायालयाने कपूर याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. कपूर याच्या कंपनीने डीएचएफएलकडून लाच घेतली नाही तर त्यांनी कर्ज घेतले, असा युक्तिवाद राणा कपूरच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला.
ईडीतर्फे हितेन वेणेगावकर यांनी कपूरच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. कपूरच्या मुलीही या कंपनीच्या मालक आहेत, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. ईडीच्या म्हणण्यानुसार कपूर, त्याची पत्नी व मुलींच्या नियंत्रणात असलेल्या कंपनीला ४,३०० कोटी रुपयांची लाच देण्यात आली. सीबीआयही या प्रकरणाचा तपास करत आहे.
.......................