Join us

एकनाथांच्या विरोधात रमेशांचे बंड

By admin | Updated: September 27, 2014 22:51 IST

केवळ वशिलेबाजीसह अन्य कारणो दाखवत सुभाष भोईर यांना संधी दिल्याने नाराज झालेल्या रमेश म्हात्रे यांनी शनिवारी भाजपाची साथ धरत प्रवास सुरु केला.

डोंबिवली : तब्बल 38 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेशी एकनिष्ठ राहूनही पक्षाने विधानसभेची उमेदवारी देतांना केवळ वशिलेबाजीसह अन्य कारणो दाखवत सुभाष भोईर यांना संधी दिल्याने नाराज झालेल्या रमेश म्हात्रे यांनी शनिवारी भाजपाची साथ धरत प्रवास सुरु केला. भाजपनेही त्यांना कल्याण ग्रामीणसाठी पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी दिली असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा संपर्क नेते एकनाथ शिंदे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. शिंदे यांनी विशिष्ट पदाधिका-यांवर अन्याय केला आहे. अशा शिंदेशाहीचा धिक्कार  करत कल्याण ग्रामीणसह डोंबिवली शहरातील शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.  खासदारकीलाही त्यांनी मुलाला आणून या ठिकाणच्या ज्येष्ट शिवसैनिकांच्या कर्तृत्वावर पाणी फिरवत अविश्वास दाखवला. ते जिल्हा संपर्कप्रमुख असूनही कधीही कोणाचाही फोन उचलत नाहीत. त्यांना समस्या कशा आणि कधी सांगायच्या. 
नेहमीच सैनिकांना झुलवत ठेवण्यात येते आणि त्यांच्या मर्जीतीलच - कंपूतील माणसांनाच विविध पदांवर पाठवले जाते. हे कुठले संघटन? असा टाहो फोडत अशी बेबंदशाही आम्हाला नको. स्वतंत्र आणि दडपणाविना काम करणो, मोकळा श्वास घेत कार्यरत राहणो आम्हाला हवे आहे असा सूर सर्वानी आळविल्यानंतर म्हात्रे यांना शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.
संकटात सापडलेल्या नागरिकांना धीर देण्याचे काम आम्ही सातत्याने करतो, तेव्हा वेळ काळ काहीही बघत नाही. त्यावेळीही केवळ देखल्या देवा दंडवतासारखा फोन करुन आम्ही कसे चुकलो याच्या त्रुटीच दाखवल्या जात असल्याचेही सांगण्यात आले. हे योग्य नाही. जो संघटनेसाठी खपतो त्याला एकटे कसे पाडता, आणि जो केवळ पदासाठी येतो त्याला जवळ का करता. काय चांगले काय वाईट हे तरी समजते की नाही.   (प्रतिनिधी)
 
म्हात्रे यांच्या उमेदवारीने कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे उमेदवार रमेश पाटील यांच्यात ख-या अर्थाने टक्कर होणार आहे. शिवसेनेच्या वतीने सुभाष भोईर यांना उमेदवारी देण्यात आली असली तरीही त्यांच्याबद्दल सैनिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची चर्चा शहरात रंगली होती.