Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीत उत्तर भारतीयांची मोट बांधण्यासाठी 'हे' दोन दिग्गज आले एकत्र

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 29, 2023 15:18 IST

प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा व राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते व राज्याचे माजी राज्यमंत्री रमेश दुबे हे उत्तर भारतीयांची महाआघाडीत मोट बांधण्यासाठी सक्रीय झाले आहेत. 

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला जोरदार टक्कर देण्यासाठी उत्तर भारतीय नेते सक्रीय झाले आहेत. महाआघाडीत उत्तर भारतीयांची मोट बांधण्यासाठी दोन दिग्गज एकत्र आले आहेत. प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा व राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते व राज्याचे माजी राज्यमंत्री रमेश दुबे हे उत्तर भारतीयांची महाआघाडीत मोट बांधण्यासाठी सक्रीय झाले आहेत. 

दुबे यांनी काल खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची त्यांच्या जुहू येथील रामायण बंगल्यात भेट घेतली आणि आगामी लोकसभा  निवडणुकीत उत्तर भारतीयांना एकत्र आणणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. तर आपण देखिल महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याची ग्वाही सिन्हा यांनी दुबे यांना दिल्याची माहिती आहे. या दोन उत्तर भारतीय नेत्यांच्या सक्रियतेने आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला मोठे पाठबळ मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा उपस्थित होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय सभागृहात ६ नोव्हेंबरला रमेश दुबे यांनी राजकारणावर आधारीत लिहिलेल्या अमृतकलश यात्रा या पुस्तकाचे प्रकाशन केले होते.यावेळी ठाकरे आणि दुबे यांच्यात राजकरणावर चर्चा झाली होती आणि उत्तर भारतीयांना न्याय देण्यासाठी आपण दोघे एकत्र मिळून काम केले पाहिजे. यावर या दोघांमध्ये एकमत झाल्याचे समजते. यावेळी या पुस्तकाची प्रत दुबे यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना भेट दिली. 

कोण आहेत रमेश दुबे?रमेश दुबे हे अंधेरीकर असून त्यांनी महाराष्ट्राचे राज्य मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी खासदारपद भूषवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. महाआघाडीत उत्तर भारतीयांची मोट बांधण्यात आणि या दोघां नेत्यांची भेट घडवण्यात तसेच उद्धव ठाकरे व रमेश दुबे यांची भेट घडवून आणण्यात शरद पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली असल्याचे समजते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवार म्हणून रमेश दुबे यांच्या नावाची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. 

टॅग्स :मुंबईशत्रुघ्न सिन्हा