खोपोली : सर्वात जास्त काळ नगराध्यक्षपद भूषविलेले माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांचे व्याही रामदास शेंडे यांनी भाजपा कार्यालयात जाऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी ही राष्ट्रवादीची चाल तर नाही ना? याची चाचपणी भाजपावाले करीत आहेत.रामदास शेंडे हे खोपोलीतील वजनदार राजकीय व्यक्तिमत्त्व, खोपोलीचे नगराध्यक्षपद त्यांनी चार वेळा भूषविले. १९९५ साली त्यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष विधानसभा निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला तरी २० हजार मते घेऊन काँग्रेस उमेदवाराला पाडण्यात त्यांना यश आले. त्यांचा एक मुलगा खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. आमदार सुरेश लाड यांचे ते व्याही आहेत. त्यामुळे अचानक शेंडे यांनी भाजपा कार्यालयात येऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करणे व तेही विधानसभा निवडणुकीच्या दीड महिना अगोदर, त्यामुळे भाजपा नेत्यांनीही सावध पवित्रा घेतला आहे.२००५ साली शेंडे यांनी शेकापक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो वरच्या पातळीवर निर्णय होऊनच. मग आता भाजपा प्रवेशावेळी पक्ष कार्यालयात खुली चर्चा करण्यामागे शेंडे यांचे कोणते डावपेच आहेत हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. खोपोली नगरपरिषद निवडणुकीपर्यंत शहरात भाजपा मजबूत करण्याबाबतही शेंडे यांनी चर्चा केली. भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी रामदास शेंडे यांनी भाजपा कार्यालयात येऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. पक्षातील सहकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करूनच कोणताही निर्णय घेतला जाईल, असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
रामदास शेंडे भाजपाच्या वाटेवर?
By admin | Updated: September 7, 2014 23:56 IST