Join us  

रामदास कदमांची 'खुर्ची' रिकामीच, समारोप कार्यक्रमानंतर रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 6:28 PM

विधान परिषद आमदारांच्या निरोप संमारंभाचे फोटो काढताना रामदास कदम यांना पहिल्याच रांगेत स्थान दिले होते, मात्र त्यांची खुर्ची शेवटपर्यंत रिकामीच राहिली. त्यामुळे, रामदास कदम नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. 

ठळक मुद्देविधान परिषद आमदारांच्या निरोप संमारंभाचे फोटो काढताना रामदास कदम यांना पहिल्याच रांगेत स्थान दिले होते, मात्र त्यांची खुर्ची शेवटपर्यंत रिकामीच राहिली. त्यामुळे, रामदास कदम नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. 

मुंबई - परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अलिकडेच जोरदार टीकास्त्र सोडणारे माजी मंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सध्या वादळ निर्माण केले आहे. विधानभवनात त्यांची एंट्री शुक्रवारी अशीच वादळी झाली. सुरक्षा रक्षकाने त्यांना गेटवरच अडवल्याने त्यांचा अवमान झाल्याची चर्चा होत होती. त्यानंतर, आज विधानपरिषदेतील कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांना निरोप देताना त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. 

विधान परिषदेत कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांना निरोप देताना विधिमंडळाच्या पायऱ्यावर फोटोसेशन करण्यात आले. परंतु, यावेळी शिवसेनेचे आमदार रामदास कदम आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप अनुपस्थित होते. शिवसेना नेते रामदास कदम यावेत, यासाठी इतर सदस्यांनी बराच वाट पाहिली. विशेष म्हणजे रामदास कदम यांची खुर्चीही ठेवली होती, परंतु रामदास कदम शेवटपर्यंत न आल्याने त्यांची खुर्ची रिकामी राहिली. विधान परिषद आमदारांच्या निरोप संमारंभाचे फोटो काढताना रामदास कदम यांना पहिल्याच रांगेत स्थान दिले होते, मात्र त्यांची खुर्ची शेवटपर्यंत रिकामीच राहिली. त्यामुळे, रामदास कदम नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. 

विधानसभवनात अडवलं

विधानभवनात यायचे तर कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे अनिवार्य आहे. तेही ४८ तास आधी चाचणी केलेली असणे सक्तीचे करण्यात आले आहे. मंत्र्यांपासून कुणालाही अपवाद केलेले नाही. रामदास कदम विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आले तेव्हा सुरक्षारक्षकाने त्यांच्याकडे कोरोना चाचणीचा अहवाल मागितला. तो त्यांच्याकडे नसल्याने आत जाता येणार नाही, असे त्याने बजावले. कदम यांनी सुरक्षारक्षकास समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना रोखण्यात आले. 

एकनाथ शिंदे धावले

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती देण्यात आली. ते लगेच प्रवेशद्वारावर आले. रामदासभाईंकडे कोरोना अहवाल नसला तरी त्यांची तातडीने अँटिजेन टेस्ट करून घ्यावी व त्यांना आत जाऊ द्यावे, असा उपाय काढण्यात आला. त्यानुसार कदम यांची अँटिजेन टेस्ट करून त्यांना आत जाऊ देण्यात आले. रामदास कदम आणि अनिल परब या शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वितुष्ट असल्याची चर्चा आहे. त्यातूनच कदम यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :मुंबईरामदास कदमशिवसेनाविधान भवन