मुंबई : दलितांवर अत्याचार होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन धारण केले आहे. दलितांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असूनही, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही शांत आहेत. त्यामुळे आठवले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी केली.दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत, काँग्रेसने सोमवारी देशभर लाक्षणिक उपोषण केले. मुंबई काँग्रेसतर्फे महापालिका मुख्यालयासमोरील अमर जवान ज्योतीजवळ सामूहिक उपवास करण्यात आला. या वेळी संजय निरुपम बोलत होते.ते म्हणाले, भाजपा सरकारच्या चुकीच्या, द्वेषपूर्ण आणि दलितविरोधी भूमिकेमुळे देशभरात आजवर कोरेगाव भीमासारख्या हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. भाजपा सरकार आजपावेतो जातीयवादाच्या भूमिकेवरच राजकारण करत आले आहे. त्यामुळे देशातील शांतता आणि सामाजिक सलोखा नष्ट होत चालला आहे.अशा वेळी जनतेमध्ये सामाजिक एकोपा साधण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाला करावी लागणार आहे. यासाठीच काँग्रेसने देशभर सामूहिक उपोषण पुकारले आहे. त्याचाच भाग म्हणून आजचे लाक्षणिक उपोषण आहे.>संभ्रम निर्माण करण्यासाठीच काँग्रेसचे उपोषण - रिपाइंदलितांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेस उपोषणाचे नाटक करत आहे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काँग्रेसला दलित आणि मुस्लीम समाजाची आठवण झाली आहे. दुपारी १२ वाजता भरल्या पोटी सुरू केलेल्या उपोषणाने काँग्रेस नेमके काय साध्य करू पाहात आहे, असा सवाल रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या काळातच दलितांवर सर्वाधिक अत्याचारांच्या घटना घडल्या, तसेच अॅट्रॉसिटी कायदा सौम्य करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काळातच सर्वात आधी झाल्याचा दावा महातेकर यांनी केला. काँग्रेसच्या या दिखाऊ राजकीय भूमिकेला जनता कंटाळली असून, काँग्रेसने दलित समाजाला गृहित धरू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
रामदास आठवले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 02:08 IST