Join us

रमजाननिमित्त बाजारपेठ फुलली

By admin | Updated: June 30, 2015 01:11 IST

मुस्लीम धर्मीयांचा पवित्र सण असलेल्या रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांचे रोजे सुरू आहेत. या दिवसात मुस्लीम बांधवांकडून महिनाभर रोजा पाळला जातो आणि फळे

प्राची सोनवणे,  नवी मुंबईमुस्लीम धर्मीयांचा पवित्र सण असलेल्या रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांचे रोजे सुरू आहेत. या दिवसात मुस्लीम बांधवांकडून महिनाभर रोजा पाळला जातो आणि फळे खाऊन हा रोजा सोडला जातो. त्यामुळे या कालावधीत फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीमधील एपीएमसी घाऊक बाजारात फळांची मोठी आवक आहे. डाळिंब, खरबूज, कलिंगड, पपई, मोसंबी या फळांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महिनाभर चाललेल्या या रोजामुळे फळ बाजारात गर्दी पाहायला मिळते आहे. संध्याकाळी (इफ्तार) रोजा सोडते वेळी खजूर खाऊन फळांचे सेवन केले जाते. म्हणून रमजानच्या या काळात फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. फळांची ही मागणी पाहता आवक पाच हजार क्विंटलपर्यंत गेली आहे. वाशीच्या घाऊक बाजारपेठेत ९५० क्विंटल डाळिंब, ७०० क्विंटल मोसंबी, साडेनऊ हजार क्विंटल कलिंगड, ११०० ते १२०० क्विंटल अननसाची दररोज आवक होत आहे. दररोज ४०० ते ५०० ट्रक फळांची आवक होते. यामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेश या ठिकाणाहून येणाऱ्या आंब्यांनाही मागणी आहे, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. दररोज सात ते आठ हजार क्विंटल आंब्यांची आयात केली जात. यामध्ये बलसाडचा आंबा, दशहरी, केसर, लंगडा, चौसा, बदामी या आंब्यांच्या जातींचा समावेश आहे. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फळांची आवक आहे, फळांच्या दरातही वाढ झाली नसल्याने खप चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.