Join us

भातसा धरणाची सुरक्षा रामभरोसे...

By admin | Updated: November 17, 2014 00:02 IST

त्यासाठी धरणाच्या दोन्ही बाजूंना पूर्वी चेकपोस्ट स्थापन केले होते.धरणावर जाऊ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची तेथे नोंद केली जात होती

भातसानगर - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील धरणांपैकी सर्वात मोठे व महत्त्वाचे असलेल्या भातसा धरणाच्या परिसरात कसलीही सुरक्षा नसल्याने धरणाच्या पायथ्यापासून वरपर्यंत कोणीही, कधीही विनासायास जाऊ-येऊ शकते. थोडक्यात, धरणाच्या सुरक्षेबाबत मुंबई महापालिकेसह पाटबंधारे विभागाचे प्रशासन उदासीन असल्याचे दिसते. मुंबईला पाणीपुरवठा करणारी शहापूर तालुक्यातील धरणे अतिरेक्यांच्या प्राधान्यसूचित वरच्या क्रमांकावर असल्याचे मध्यंतरी शासनाकडून सांगितले जात होते. त्यासाठी धरणाच्या दोन्ही बाजूंना पूर्वी चेकपोस्ट स्थापन केले होते.धरणावर जाऊ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची तेथे नोंद केली जात होती. मात्र, तेथील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने किंवा त्याची बदली झाल्याने त्या जागी दुसरा कर्मचारी नियुक्त करण्यास संबंधित यंत्रणा विसरल्याने दोन्ही बाजूंचे चेकपोस्ट उजाड झाले असून बिनकामाचे ठरत आहेत. त्यामुळे धरणाकडे येणाऱ्या - जाणाऱ्या कोणालाही कसलाही अडथळा राहिलेला नाही. धरणाच्या सुरक्षेसाठी शहापूर पोलीस ठाण्यातर्फेकेवळ चार पोलिसांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडे २४ तास सुरक्षेची कामगिरी सोपविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भातसा धरणाचे बांधकाम चालू असताना येथे एक पोलीस चौकी उभारण्यात आली होती. ती सध्या बंद करण्यात आली आहे. धरणाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी तसेच पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी बिरवाडी-भातसानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रिया भेरे यांनी प्रशासनाकडे केली आहे. धरणाच्या सुरक्षेसंदर्भात भातसा धरण क्र मांक-१ चे अभियंता एस. आमले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)