Join us

यंदाही कोरोनाच्या छायेत रक्षाबंधन - भाऊ-बहिणीचा उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:07 IST

मुंबई : भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याची, निरागस व पवित्र प्रेमाची आठवण करून देणारा रक्षाबंधन हा सण यंदाही कोरोनाच्या छायेत साजरा ...

मुंबई : भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याची, निरागस व पवित्र प्रेमाची आठवण करून देणारा रक्षाबंधन हा सण यंदाही कोरोनाच्या छायेत साजरा करावा लागत आहे. मागील वर्षी कोरोनाचे संकट गडद असल्याने अनेक कुटुंबांमध्ये भाऊ बहीण एकमेकांकडे न जाता त्यांनी घरच्या घरीच किंवा ऑनलाइन पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला. यंदा शहरात कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. त्याचप्रमाणे सरकारने निर्बंधांमध्ये देखील शिथिलता दिली आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट असले तरीदेखील भाऊ बहीण उत्साहात हा सण साजरा करणार आहेत. यंदा भाऊ-बहीण एकमेकांकडे जाऊन मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळूनच रक्षाबंधन साजरा करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शिरीष देवळे - रक्षाबंधनाला बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून दोघांच्या नात्यामधील ऐक्य आणि प्रेमभाव वाढविते. गेल्यावर्षी रक्षाबंधनाला भाऊ बहिणीची गाठभेट न झाल्याने घरात काहीसे उदास वातावरण होते. यंदा मात्र उत्साहात रक्षाबंधन साजरा केला जाईल.

आशिष नाईक - यंदाचा रक्षाबंधन साजरा करताना आम्ही बहीण व भाऊ देवाकडे हेच मागणे मागणार आहोत की, पुन्हा या जगावर कधी कोरोनासारख्या रोगाचे सावट आणू नकोस. तसेच भाऊ बहिणीच्या नात्याप्रमाणे समाजातील सर्व व्यक्तींमधील बंधुभाव नेहमी वृद्धिंगत होत राहो.

अनघा माळी - बहीण आपल्या भावाला राखी बांधते याचा अर्थ भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. जगातील प्रत्येक भावाने आपल्या बहिणीप्रमाणेच इतरांच्या बहिणीचे रक्षण व तिचा आदर करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. तरच रक्षाबंधन या सणातून खरा उद्देश साध्य होईल.

मोनिका शिरोडकर - प्रत्येक भाऊ बहिणीने घरातील प्रत्येक सदस्याचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तसेच इतरांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचा आग्रह धरायला हवा. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने सण साजरे करताना नियमांचे पालन करायला हवे. तरच पुढल्या वर्षापासून आपल्याला सण थाटामाटात व उत्साहात साजरे करता येतील.