Join us  

सातपैकी पाच वर्षांची शिक्षा भोगून झाल्यानंतर झाली निर्दोष सुटका, बलात्काराच्या खोट्या खटल्यात पोस्टमनला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:58 AM

अंबरनाथ येथे राहणाऱ्या आणि कळवा येथे पोस्टमन म्हणून नोकरी करणाऱ्या एका तरुणाने, अल्पवयीन मुलीवर न केलेल्या बलात्काराबद्दल सातपैकी पाच वर्षांची कैद भोगल्यावर, आता मुंबई उच्च न्यायालयाने अपीलात त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.

मुंबई : अंबरनाथ येथे राहणाऱ्या आणि कळवा येथे पोस्टमन म्हणून नोकरी करणाऱ्या एका तरुणाने, अल्पवयीन मुलीवर न केलेल्या बलात्काराबद्दल सातपैकी पाच वर्षांची कैद भोगल्यावर, आता मुंबई उच्च न्यायालयाने अपीलात त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.अंबरनाथ (पू.) येथील बुवापाड्यातील गणेश चौकात राहणाºया गोरक्ष अर्जुन महाकाल यास कल्याण येथील सत्र न्यायालयाने एका १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवून, भादंवि कलम ३७६ व ‘पॉक्सो’ कायद्यान्वये सात वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.याविरुद्ध गोरक्षने केलेले अपील मंजूर करून, न्या. साधना एस.जाधव यांनी त्याची निर्दोष मुक्तता केली. मात्र, तोपर्यंत गोरक्षची सातपैकी पाच वर्षे तीन महिन्यांची शिक्षा भोगूनही झाली होती. याशिवाय या खोट्या खटल्यात अटक झाल्यावर त्याची सरकारी नोकरी गेली, ही त्याला झालेली याहूनही मोठी शिक्षा होती. आता निर्दोष सुटूनही या शिक्षेचे परिमार्जन होणार नाही.अंबरनाथ नगर परिषदेच्या पाणीपुरवठा खात्यात काम करणाºया एका कर्मचाºयाच्या मुलीच्या फिर्यादीवरून गोरक्षवर हा खटला चालला होता. गोरक्ष व ती मुलगी एकाच भागात राहायची व त्यांची मैत्री होती. बारावीत नापास झाल्यावर तिने एमएस-सीआयटीसाठी एक कॉम्प्यूटर क्लास लावला. क्लास तिच्या घरापासून एक किमी अंतरावर होता. कधी ती चालत जायची, तर कधी गोरक्षच्या बाइकवरून जायची.या मुलीची फिर्याद अशी होती की, २१ डिसेंबर, २०१३ रोजी ती गोरक्षच्या बाइकवरून क्लासला गेली. गोरक्ष तिला घेऊन तीनझाडी येथे गेला. तेथे तिला लग्नाची मागणी घातली, नंतर ते दोघे टिटवाळ्याला गेले. एका लॉजवरही राहिले. तेथे गोरक्षने तिच्यावर बलात्कार केला.‘फिर्याद विश्वासार्ह नाही’ : उच्च न्यायालयाने सर्व साक्षी-पुराव्यांचा विचार करून मुलीची फिर्याद विश्वासार्ह नसल्याचा निष्कर्ष काढला. दोघांचा शरीरसंबंध संमतीने झाला असावा, असे दिसते. तिचे मोबाइल लोकेशन तपासले असता, त्या दिवशी ती दिवसभर अंबरनाथमध्येच होती, असे स्पष्ट होते. दोघांचे प्रेम होते व घरच्यांचा विरोध होता, हे लक्षात घेऊन तिने ही फिर्याद केली असावी, असाही निष्कर्ष न्यायालयाने काढला.

टॅग्स :न्यायालयउच्च न्यायालय