Join us  

मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ‘राजधानी’ ट्रेन धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 9:47 PM

ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ,जेवण देण्यात येणार नाही. त्यामुळे तिकिटदरातून कॅटरिंगचे दर वजा करण्यात आले आहेत.

मुंबई :  भारतीय रेल्वने  काही  प्रमुख निवडलेल्या मार्गावर प्रवासी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात १२ मे रोजी मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ‘राजधानी’ प्रमाणे ट्रेन धावणार आहे. या गाडीला ११ तृतीय श्रेणीचे एसी डबे आणि 5 द्वितीय श्रेणीचे एसी डबे असणार आहेत. 

    या विशेष  ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ,जेवण देण्यात येणार नाही. त्यामुळे तिकिटदरातून कॅटरिंगचे दर वजा करण्यात आले आहेत. त्यानुसार तृतीय श्रेणी एसीकरीता १ हजार ७९५, द्वितीय श्रेणी  एसीला २ हजार ५८५ तिकिट आकारण्यात आले आहेत. मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली ट्रेन  बोरीवली,सुरत,वडोदरा,रतलाम,नागडा आणि कोटा स्थानकात थांबणार आहे. प्रवाशांनी स्वत:चे जेवण, पिण्याचे पाणी व अंथरूण-पांघरूण आणावे, असे सांगण्यात आले आहे. गाडीत काही सुके पाकीटबंद खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत मिळू शकतील. गाडीतील स्वच्छतागृहांची साफसफाईही केली जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

भारतीय रेल्वे उद्या मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १५ शहरांसाठी विशेष गाड्या सुरू करण्यात येतील. या गाड्यांना ‘राजधानी’प्रमाणे फक्त वातानुकूलित डबे असतील व त्यांचे भाडेही ‘राजधानी’एवढेच आहे.

दिल्लीहून दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद व जम्मू-तावी या शहरांसाठी या गाड्या सोडण्यात येतील. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच स्टेशनवरून या गाड्या दिल्लीसाठी सुटतील.

या गाड्यांची आॅनलाईन आगाऊ तिकीट विक्री ‘आयआरसीटीसी’च्या वेबसाईटवरून सोमवारी सायंकाळी ६  वाजल्यापासून सुरू झाली होती.

............

फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जाणार आहे. श्रमिक ट्रेन चालविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे या देखील ट्रेन चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

 ------------

नवी दिल्ली-मडगाव-नवी दिल्ली विशेष ट्रेननवी दिल्ली-मडगाव-नवी दिल्ली स्पेशल ट्रेन १५ मे पासून सुरु होणार आहे. ही ट्रेन सोमवार, शनिवार,शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. या ट्रेनला थिविम,कुडाळ,रत्नागिरी,पनवेल,वसई,सुरत,वडोदरा आणि कोटा स्थानकात थांबा दिला आहे.

टॅग्स :राजधानी एक्स्प्रेसकोरोना वायरस बातम्या