Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजावाडी : त्रिसदस्यी समितीची कार्यवाही अंतिम टप्प्यात; समितीच्या शिफारशींनुसार संबंधितांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाटकोपर (पूर्व) परिसरात महापालिकेचे सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा मनपा सर्वोपचार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घाटकोपर (पूर्व) परिसरात महापालिकेचे सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा मनपा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी हे रुग्णालय असून, काही दिवसांपूर्वी या रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल रुग्णाच्याबाबत मूषक दंशाचा दुर्दैवी प्रकार घडला होता. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन त्रिसदस्यी समिती गठीत केली. आता याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, समितीच्या शिफारशींनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एका रुग्णाच्या डोळ्याखालील भाग उंदराने कुरतडल्याची घटना समजताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने राजावाडी रुग्णालयाला २२ जून रोजी भेट देऊन संबंधित रुग्णाची पाहणी केली. तसेच याबाबत चौकशीचे आदेश दिले. अतिदक्षता विभाग हा सोयीच्या दृष्टिकोनातून तळमजल्याला असला पाहिजे. परंतु या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आल्यानंतरही उंदराने संबंधित रुग्णाचा डोळ्याखालील भाग कुरतडल्याची घटना घडली. ही गंभीर बाब आहे, असे महापौर म्हणाल्या होत्या. दरम्यान, अतिदक्षता कक्षासाठी आवश्यक सेवांपैकी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा बाह्यसेवा पुरवठादारांमार्फत जुलै २०१८ पासून घेण्यात येतात. राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षासाठी तिन्ही पाळ्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर मंडळी कार्यरत असतात. अतिदक्षता सुविधेअंतर्गत सध्या एकूण ३१ खाटा आहेत. यापैकी ११ बिगर कोविड खाटा असून उर्वरित २० कोविड रुग्णांसाठी आहेत. रुग्णालयामध्ये गरजू कोविड रुग्णांसाठी अतिदक्षता सेवा या १० एप्रिल २०२१ पासून कार्यान्वित आहेत. या सेवांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा या बाह्यसेवा पुरवठादारांमार्फत उपलब्ध आहेत.