Join us  

शिवसेना विधानसभा अध्यक्षपदासाठी मैदानात, कोकणातील आक्रमक आमदार राजन साळवींना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 11:51 AM

Maharashtra Assembly Speaker Election: शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे.

मुंबई - राज्यातील सरकार बदलल्यानंतर आता गेल्या दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाने राहुल नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेनेही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे.

उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी यावर चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास काही वेळ शिल्लक असतानाच राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज मविआ नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने राहुल नार्वेकर यांचे नाव पुढे करत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शिवसेनेनेही नार्वेकर यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्यासाठी पावले उचलली. तसेच या उमेदवारीसाठी शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांचं नाव आघाडीवर असल्याचं दिसत होतं. अखेरीस महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राजन साळवी यांनी राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाली होती. आता होणाऱ्या निवडणुकीत राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :राजन साळवीशिवसेनाविधानसभामहाविकास आघाडी