Join us

राज पुरोहितांनी मागितली लोढांची माफी

By admin | Updated: July 22, 2015 01:07 IST

आपल्यासंदर्भात अलीकडे प्रस्तुत करण्यात आलेली सीडी बोगस होती, असे एकीकडे सांगत ‘तरीही आपल्यामुळे आ. मंगलप्रभात लोढा यांच्या

मुंबई : आपल्यासंदर्भात अलीकडे प्रस्तुत करण्यात आलेली सीडी बोगस होती, असे एकीकडे सांगत ‘तरीही आपल्यामुळे आ. मंगलप्रभात लोढा यांच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो,’ असे भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी आज विधानसभेत सांगितले.पुरोहित यांची सीडी अलीकडे गाजली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील हे पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करीत असताना पुरोहित आणि इतर काही सत्तारूढ सदस्य बसून काहीतरी बोलले. पाटील यांनी हे निमित्त साधून पुरोहित यांना कोपरखळी मारण्यास सुरुवात केली. ‘राज पुरोहित आपण तर बोलूच नका. आपण आपल्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल, पंतप्रधानांबद्दल आणि आ. मंगलप्रभात लोढा यांच्याबद्दल काय-काय बोललात हे जगाने पाहिले आहे, असे जयंत पाटील म्हणाले. बोचऱ्या टीकेने अस्वस्थ झालेले पुरोहित म्हणाले की, ती सीडी जोडतोड केलेली असून, बोगस आहे. लोढा यांच्या घराण्याशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केले आहे. ते ज्येष्ठ सदस्य आहेत. ती सीडी बोगस होती तरीही लोढा यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतोे. (विशेष प्रतिनिधी)