Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचे प्रश्न आणि घुसमटत जगणारे महामुंबईकर

By अतुल कुलकर्णी | Updated: March 16, 2026 09:02 IST

विधानसभेचे अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात दोन दिवस सगळे विषय बाजूला सारून या महानगराच्या प्रश्नांवर आणि या शहराला गती देणाऱ्यांवर चर्चा करण्याचा आग्रह सर्वपक्षीय आमदार धरत नसतील, तर त्यांना जाब विचारण्याची जबाबदारी त्यांना निवडून देणाऱ्यांची आहे. या अशा महानगराविषयी राज ठाकरे काय बोलणार, ते पाडव्या दिवशी कळेल...

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

गुढीपाडव्याला मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सभा आहे. त्या सभेचा एक टिझर सर्वत्र फिरत आहे. महाराष्ट्रात जे चालले आहे ते पटत नाही?, रोजच्या घटना पाहून मनस्ताप होतो का?, महाराष्ट्राची ही अवस्था पाहून अस्वस्थ झाला आहात का?, असे वाटणारे तुम्ही एकटे नाहीत..! प्रत्येकाला असे वाटत आहे... असे मुद्दे त्यातून मांडले गेले आहेत. अशीच काहीशी अस्वस्थता अवघे आयुष्य मुंबईत घालवलेल्या एका नेत्याने बोलताना दाखवली. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांना एक प्रश्न केला. “तुम्ही इतकी वर्षे एका प्रमुख राजकीय पक्षात आहात. तुम्हाला ही व्यवस्था बदलावी असे वाटले नाही का ?” त्यावर “आम्ही देखील आता हतबल आहोत”, असे त्यांचे उत्तर होते. तुम्ही म्हणाल, असे काय मुद्दे त्यांनी मांडले? म्हणून आधी त्यांचे म्हणणे जशास तसे देतो -

“रोज लाखो लोक सकाळी ठाणे, डोंबिवली, कल्याण, येथून धक्के खात मुंबईत येतात. गर्दीचे लोंढेच त्यांना लोकलमध्ये कोंबतात. तेच लोंढे लोकलमधून बाहेर काढतात. मेगा ब्लॉकच्या दिवशी जेवढा वेळ लोकलच्या प्रवासाला लागतो, तेवढाच वेळ त्यांचा स्टेशनवर जातो. अर्ध्या देशातून मुंबईत विमानाने यायला एक ते दोन तास लागतात. मात्र कल्याण-डोंबिवलीच्या माणसाला बाय रोड यायला किमान तीन तास लागतात. त्याच्या नशिबाने लोकल वेळेवर असेल, तरी त्याचे दोन तास जातातच. आठ तास तो काम करतो. पुन्हा तितकाच वेळ प्रवासात घालवतो. हे लोक घरी जाऊन घरच्यांना वेळ कधी देत असतील?, स्वतःची सुख-दुःखं कधी एकमेकांना सांगत असतील? ठाणे, डोंबिवली, कल्याण या भागांतून रोजच्या कामधंद्यासाठी मुंबईत येणाऱ्यांचे दुःख, वेदना कमी करणारी कसलीही ट्रान्सपोर्ट सिस्टीम अजून उभी राहत नाही. केईएम, नायर, सायन, कूपर, जे जे ही मुंबईतली प्रमुख हॉस्पिटल्स तुडुंब भरलेली असतात. लोकलच्या प्रवासासाठी रांगा, हॉटेलमध्ये जेवणासाठी रांगा, सुलभ शाैचालयासमोरही रांगा, हॉस्पिटलसमोर रांगा आणि स्मशानभूमीतही रांगाच... या महानगरात जगणाऱ्यांच्या आयुष्यातली रांग कधी कमी होणार, हे परमेश्वरही सांगू शकणार नाही...” असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले. 

“तुम्ही एका राजकीय पक्षाशी संबंधित आहात. तुम्ही अधिवेशनात हे मुद्दे का उचलत नाही. इतके दिवस अधिवेशन चालते. त्यातले दोन दिवस मुंबईकरांचे दुःख हलके होण्यासाठी, त्यावर खात्रीशीर उपाय योजना करण्यासाठी, ठोस चर्चा करावी, असे का वाटत नाही का?” या प्रश्नावर ते म्हणाले, “दोन-चार लोकांनी बोलून काय होणार! सभागृहातल्या चर्चेतून माध्यमांना स्पायसी बातम्या मिळत नाहीत. त्यामुळे ते फार लक्ष देत नाहीत. शिवाय, मुंबई सुधारण्याच्या पलीकडे गेली आहे, ही भावना जास्त वाढीला लागली आहे. ती कशी बदलणार?” या त्यांच्या प्रतिप्रश्नावर काय बोलणार?

लोक दुरून या शहरात येतात. कसली तक्रार करत नाहीत. हा या महानगरांमध्ये राहणाऱ्यांचा सोशिकपणा म्हणायचा की मजबुरी ? युपी, बिहारमधून मोठ्या प्रमाणावर लोंढे महानगरात येतात. त्यांच्या राज्यांमध्ये त्यांना काम मिळत नाही. इथे कष्ट करून चार पैसे आपल्या गावी पाठवण्याकडे त्यांचा ओढा असतो. या महानगरात राहणाऱ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे दुःख केवळ घोषणा आणि चर्चेभोवती फिरत राहते. प्रत्यक्षात मात्र मुंबईकर लोकलच्या गर्दीत रोज घाण्याच्या बैलासारखा गोल गोल फिरत राहतो. मंत्रालयाच्या आजूबाजूला राहणारे आयएएस, आयपीएस अधिकारी ज्या दिवशी ठाणे, कल्याण, डोंबिवलीवरून मंत्रालयात येणे-जाणे करतील त्या दिवशी इथल्या वाहतुकीचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. बड्या-बड्या खासगी हॉस्पिटलमध्ये न जाता हेच अधिकारी, नेते सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाऊ लागतील, त्या दिवशी सगळी सरकारी हॉस्पिटल्स झटक्यात सुधारतील. ठाणे, पालघर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत एकातरी बड्या नेत्याने, अधिकाऱ्याने उपचार घेतल्याची बातमी तुम्ही वाचली का ?, जे जे हॉस्पिटलमध्ये जे उपचार अधिकारी आणि नेत्यांना मिळतात, तसे उपचार रांगा लावून उभ्या असणाऱ्या रुग्णांना मिळतात का?, पालघर जिल्ह्यात मार्च महिन्यातच डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन काही किलोमीटर पायपीट करणाऱ्या महिलांचे दुःख कधीही चर्चेला येते का?, गरोदर महिलेला झोळीत टाकून कच्च्या वाटेने दवाखान्यात नेण्याचे प्रकार आजही पालघर जिल्ह्यात घडतात. ते पाहून कधी कोणी पेटून उठल्याचे पाहिले का?, असे घडत नाही, हेच तर दुर्दैव आहे.

ज्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांचे महिन्यातले किती तास दहा ते बारा किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाडीमध्ये जातात? कोणते रस्ते, पूल कसे बांधावेत याचे कसलेच नियोजन होत नाही. मिरा-भाईंदर येथे बांधलेला उड्डाणपूल हे जगातले आश्चर्य ठरावे असा बांधला गेला. त्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. लोकांचा वेळ गेला. एवढे करून ज्यांनी त्या पुलाचे डिझाइन फायनल केले ते अधिकारी सेवानिवृत्त होऊन आरामात घरी गेले. यातल्या कोणालाही, कसलीही शिक्षा झाली नाही. कसला दंड झाला नाही. गर्दीच्या वेळी मुंबई विमानतळावरून एखाद्या बड्या नेत्याचा कॉन्व्हाय जाणार असेल, तर पुढे-मागे दोन-दोन किलोमीटर ट्रॅफिक जॅम होते. जागोजागी पसरलेले कचऱ्याचे ढीग, फुटपाथवरची अतिक्रमणे, उड्डाणपुलांच्या खाली भंगार गाड्यांचे ढीग, कोणीही कुठेही टाकलेल्या झोपड्या, ही अशी मुंबई आणखी काही वर्षे राहिली तर ? 

सिंगापूरसारखे चरस, गांजा, अफीम यांच्या आहारी गेलेले शहर स्वतःला समूळ बदलून आगळे वेगळे रूप धारण करते. मग, मुंबईत असे का होत नाही? ज्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुंबईकरांच्या जिवावर हे शहर धावत आहे. जे लाखो हात या शहराला रोज आपापल्या कष्टातून पुढे नेत आहेत, त्यांचा विचार राज्यकर्ते कधी करणार आहेत की नाही ? ही अस्वस्थता एका नेत्याची नाही. तर कल्याण, डोंबिवली, पालघर, ठाणे, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक कष्टकऱ्याची आहे. 

विधानसभेचे अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात दोन दिवस सगळे विषय बाजूला सारून या महानगराच्या प्रश्नांवर आणि या शहराला गती देणाऱ्यांवर चर्चा करण्याचा आग्रह सर्वपक्षीय आमदार धरत नसतील, तर त्यांना जाब विचारण्याची जबाबदारी त्यांना निवडून देणाऱ्यांची आहे. या अशा महानगराविषयी राज ठाकरे काय बोलणार, ते पाडव्या दिवशी कळेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray's questions mirror the struggles of Mumbai's common man.

Web Summary : Raj Thackeray highlights Mumbai's infrastructure woes, questioning the neglect faced by daily commuters. Overcrowded trains, traffic jams, and inadequate healthcare plague the city. Apathy from leaders and officials exacerbates the problems, leaving Mumbaikars in despair. Will solutions emerge?
टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना