Join us
Daily Top 2Weekly Top 5

साधेपणाने साजरा झाला राज ठाकरेंचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५३ वा वाढदिवस सोमवारी साधेपणाने साजरा झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५३ वा वाढदिवस सोमवारी साधेपणाने साजरा झाला. एरवी वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांसह चाहत्यांची राज यांच्या कृष्णकुंजवर गर्दी होते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन राज यांनीच काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे कृष्णकुंजवर गर्दी नव्हती.

मनसे नेते बाळा नांदगावकर हे दरवर्षीप्रमाणे कृष्णकुंजबाहेर पुष्पगुच्छासह पोहोचले; मात्र बंगल्यात न जाता राज यांच्या स्वीय साहाय्यकाकडे त्यांनी पुष्पगुच्छ सोपवला. पक्षाच्या अध्यक्षांनी भेटू नका, असा आदेश दिला आहे, तो सर्वांसाठी आहे. मीसुद्धा तो पाळणार, असे सांगत नांदगावकर पुष्पगुच्छ देऊन माघारी परतले. तर कृष्णकुंजवरील सुरक्षा व्यवस्थेवरील कर्मचाऱ्यांनी मात्र केक कापत, पुष्पहार घालत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. मनसे कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात विविध सामाजिक कार्यक्रम हाती घेतले होते. सचिव सचिन मोरे आणि चेतन पेडणेकर यांनी चारशे नागरिकांचे ‘पेड’ लसीकरण केले. तर, कोरोनामुळे तीन मनसे पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना मदतनिधी उभारण्याचा उपक्रम यानिमित्ताने सुरू झाला. रक्तदान, अन्नधान्य वाटप, शालेय साहित्य वाटप असे विविध कार्यक्रम पार पडले.

तर, मनसे नेत्यांसह विविध पक्षीय नेते, कलाकारांसह समाजातील विविध स्तरातील लोकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या. तर मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून राज यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष ऑडिओ व्हिडिओ जारी करण्यात आला. राज यांच्याच एका भाषणातील महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्य आणि श्रेष्ठत्वाबाबतचे भाष्य यात होते. अलीकडच्या काळात जातीपातींच्या भेदाने डोके वर काढले असले तरी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र यातून लवकर बाहेर पडेल. महाराष्ट्र म्हणून येथील जनता एकवटेल. याला काहीसा वेळ लागला तरी हे नक्की घडेल, असा आशावाद यातून व्यक्त करण्यात आला आहे.

..........................