Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोर्न फिल्मधून राज कुंद्राची महिन्याला दीड कोटींची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:06 IST

१८ महिन्यांत २५ कोटी मिळविलेजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अश्लील चित्रफित निर्मितीमधून अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा ...

१८ महिन्यांत २५ कोटी मिळविले

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अश्लील चित्रफित निर्मितीमधून अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा महिन्याला सरासरी सव्वा ते दीड कोटी रुपये कमवित होता. गेल्या १८ महिन्यांत त्याने यातून जवळपास २५ कोटींचा गल्ला जमविला होता, अशी माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बॉलीवूडलाही मोठ्या प्रमाणात बसला असताना कुंद्राने मात्र पोर्न व न्यूड फिल्म बनवून ‘हॉटशॉट’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कमाई केली असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती व उद्योगपती राज कुंद्रा हा पोर्न रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून अटकेत असलेल्या कुंद्राकडे गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळविली आहे. पाेर्न फिल्मचे वितरण करण्याची मुख्य कल्पना त्याचीच असल्याचे उपलब्ध कागदपत्रे, अन्य आरोप आणि साक्षीदारांच्या जबाबातून उघड झाले आहे. त्याची व्याप्ती किती आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याच्याशी संबंधित सर्व बाजूंची छाननी अधिकारी करीत आहेत. त्याचा मोबाइल, अंधेरीतील कार्यालयातील कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक व डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. त्याचा डाटा तपासण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कुंद्राने गेल्या वर्षी जानेवारीपासून अश्लील चित्रपट निर्मितीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले होते. ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्याने त्याला महिन्याला सरासरी सव्वा ते दीड कोटी रुपये त्यातून मिळत होते. १८ महिन्यांत त्याला जवळपास २५ कोटींची कमाई झाली आहे.

पोर्न फिल्ममधून मिळालेली रक्कम विदेशी कंपनीला पाठवली जायची, ते पैसे एका विशिष्ट माध्यमातून पुन्हा राज कुंद्राकडे पाठविले जात होते. त्या व्यवहाराचा सविस्तर तपशील घेतला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.