हायकोर्टात याचिका; १७ जुलैला सुनावणीमुंबई : गांजावरील बंदी उठवा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या १७ जुलैला सुनावणी होणार आहे.पुणे येथील अॅड. आदित्य बारठाकूर यांनी ही याचिका केली आहे. सन १९८५ साली केंद्र सरकारने अमलीपदार्थविरोधी कायदा आणला. या कायद्यांतर्गत गांजाचे झाड लावणे, विक्री करणे व वाहतूक करणे यास बंदी आहे. त्याचे उल्लंघन केल्यास २० वर्षांची शिक्षा व २ लाख रुपये दंडाची तरतूद आहे.ही बंदी नेमकी कोणत्या कारणांसाठी घातली गेली, याचे उत्तर शोधण्यासाठी अॅड. बारठाकूर यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, आरोग्य संशोधन, भारतीय वैद्यकीय परिषद व विधी आयोग यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली. मात्र यांपैकी कोणत्याच विभागाने या बंदीचे उत्तर न दिल्याने ही बंदी उठवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे बंदीचे ठोस कारण नसल्याने ही बंदी उठवणे उपयुक्त ठरेल. आता न्यायालय काय आदेश देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. (प्रतिनिधी)
गांजावरील बंदी उठवा!
By admin | Updated: July 7, 2015 03:06 IST