Join us

पर्जन्य वृक्ष मरणपंथाला!

By admin | Updated: August 18, 2014 01:55 IST

मुंबई शहर आणि उपनगरांत ब्रिटिश काळात लागवड करण्यात आलेले पर्जन्य वृक्ष आजघडीला मरणपंथाला लागले आहेत.

मनीषा म्हात्रे, मुंबईमुंबई शहर आणि उपनगरांत ब्रिटिश काळात लागवड करण्यात आलेले पर्जन्य वृक्ष आजघडीला मरणपंथाला लागले आहेत. दुर्दैव म्हणजे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पर्जन्य वृक्षांची निगा राखणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी हे पर्जन्य वृक्ष पर्णहीन झाले असून, पालिकेच्या उदासीन कारभारामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य कागदावरच राहिले आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाची हानी होऊ नये, म्हणून उल्लेखनीय उपक्रम राबविले जात आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांतही महापालिका प्रशासनाकडून यापूर्वी अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत आणि त्या राबविण्यात आल्या आहेत. मात्र काही पर्यावरणात्मक योजनांबाबतची कार्यवाही कागदावर होत असल्याने येथील हरित संपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शहर आणि उपनगरांतील रस्त्यांलगत लावण्यात आलेले पर्जन्य वृक्ष पर्णहीन झाले आहेत. पर्जन्य वृक्षांच्या फांद्या सुकल्या असून, ऐन पावसाळ्यात पर्जन्य वृक्ष पर्णहीन होत असल्याने मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई शहर आणि उपनगरांतील पर्जन्य वृक्षांची लागवड बऱ्याच अंशी ब्रिटिश काळात करण्यात आली आहे. या वृक्षांची मुळे मोठी जागा व्यापत असून, वृक्षांच्या फांद्या डेरेदाररीत्या पसरतात. शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यात पर्जन्य वृक्ष मोलाची भूमिका बजावतात. परंतु मुंबई शहरात ज्या पद्धतीने विकास होत आहे आणि शहराचे ज्या पद्धतीने क्राँक्रिटीकरण होते आहे, त्यामुळे पर्जन्य वृक्षांच्या मुळांना तग धरून राहणे कठीण होऊन बसले आहे. पर्जन्य वृक्षांची पाळेमुळे खोलवर आणि लगत पसरत नसल्याने हे वृक्ष सुकत आहेत. शिवाय त्यामुळे वृक्षांवर कीटकांचे आक्रमण होते आहे. आणि हे वृक्ष मरणपंथाला लागत आहेत. परंतु त्याकडे पालिका प्रशासनही कानाडोळा करीत आहे.