Join us

पावसाचा खेळ वीजेचा खंडोबा

By admin | Updated: June 25, 2015 00:53 IST

मंगळवारी रात्री वादळासह कोसळलेल्या पावसामुळे वाडा तालुक्यातील अनेक घरांवरील छपरे उडाली असून त्यामुळे त्यातील रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे

वाडा : मंगळवारी रात्री वादळासह कोसळलेल्या पावसामुळे वाडा तालुक्यातील अनेक घरांवरील छपरे उडाली असून त्यामुळे त्यातील रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे तर वीजेचे खांब व तारा जागोजागी तुटल्याने रात्री पासून अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. सुर्दैवाने जिवीतहानीची एकही घटना घडली नाही.वाडा तालुक्यात मंगळवारी रात्री वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. चिंचघर-डोंगसो या रस्त्यावर झाड कोसळल्याने येथील वाहतुक काही काळ बंद होती. ग्रामपंचायत प्रशासनाने हे झाड काही तासात बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.काटी या गावातील शेतकरी संदीप निपूर्ते यांचे घर वादळाने संपूर्ण पडले असून त्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच गावातील शाम ठाकरे यांच्या घरांचे पत्रे उडाले असून त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. काटी याच गावातील हनुमान मंदिर व स्मशानभूमी वरील छपराचे पत्रे पडल्याने तिला गळती लागली आहे. देवघर येथील सिताराम पाटील या शेतकऱ्यांच्या म्हशीवर वीजेची तार पडल्याने तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बुधावली येथील शिवाजी हरड यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने ते बेघर झाले आहेत. मारवाडा या गावातील प्रकाश गावित यांच्या घरावरील पत्रे उडविल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. बिलावली येथील आदिवासी शेतकरी गणपत मुकणे यांचे घरही पावसाने उद्धवस्त झाले आहे.वाडा-अघई या मार्गावरील सावरखांड येथील रस्त्यालगत असलेले वीजेचे खांब वादळी पावसामुळे रस्त्यावरच पडल्याने येथील वाहतूक सुमारे पाच तास बंद होती. त्यानंतर खांब बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आली. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सायंकाळपर्यंत सुरू होईल असे महावितरणकडून सांगण्यात आले. घोणसई गावातही झाड वीजेच्या तारांवर पडल्याने येथील वीज पुरवठा सोमवारपासून बंद आहे. दोन ते तीन दिवसांपासून वाडा तालुक्यात वीजेचा लपंडाव सुरू असून त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. (वार्ताहर)