Join us

मुंबईकरांचे पाऊसहाल; दोन बळी

By admin | Updated: June 21, 2015 02:08 IST

शनिवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे सांताक्रुझ आणि चेंबूरमध्ये झालेल्या पडझडीत दोघांना प्राण गमवावे लागले, तर एक जखमी झाला. दुसरीकडे गेल्या २४ तासांत

मुंबई : शनिवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे सांताक्रुझ आणि चेंबूरमध्ये झालेल्या पडझडीत दोघांना प्राण गमवावे लागले, तर एक जखमी झाला. दुसरीकडे गेल्या २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेत अनुक्रमे १११, १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासांसाठी मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सांताक्रुझमधील लिबर्टी हॉटेलसमोर रिक्षावर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत मजे मंडल (४०) ही व्यक्ती जखमी झाली. त्यांना व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. चेंबूरमध्ये बीएआरसीची भिंत जवळ असलेल्या झोपडीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सखुबाई उदमले (६५) यांचा मृत्यू झाला आहे; तर शंकर उदमले (७५) यांच्या डोक्याला मार व पायाला मुका मार लागला. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खार येथील गॅलेक्सी सिनेमासमोर गटारामध्ये कंत्राटी कामगार पडला असून, त्याचा शोध सुरू आहे. बोरीवली पूर्वेकडील राय डोंगरीमधील दरडीचा काही भाग कोसळला; तसेच विक्रोळीमधील सूर्यानगर येथील दरडीचा भाग कोसळल्याची घटना घडली. दिवसभर पडलेल्या पावसामुळे सायन रोड क्रमांक ४, महेश्वरी उद्यान, हिंदमाता, एलफिन्स्टन, वांद्रे येथील नॅशनल कॉलेजलगत पाणी साचले होते. परिणामी, येथून प्रवास करणाऱ्या बेस्ट बसचे मार्ग बदलले होते. मिलन सब-वे आणि परळमध्ये मडकेबुवा चौक येथे पाणी साचल्याने येथील बेस्टची वाहतूक वळविण्यात आली होती. एलबीएस मार्गावर शीतल सिग्नल, कमानी जंक्शन व सीएसटी रोडवर पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीने समस्येत भर पडली होती.