महाड : गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी व काळ या नद्या दुथड्या भरून वाहत असून सोमवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शहर व परिसराला रविवारी रात्री निर्माण झालेला पुराचा धोका मात्र तूर्त टळला असल्याचे दिसून येत आहे.रविवारी रात्री सावित्री, गांधारी नदीचे पाणी शहरात घुसू लागल्यानंतर नागरिकांची धावपळ उडाली तर बाजारपेठेतील व्यापारी व रहिवाशांची सामानांची आवराआवर करताना तारांबळ उडाली होती. महामार्गावरून शहराकडे येणाऱ्या दस्तुरी मार्गावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक रात्री बंद झालेली होती. तर शहराच्या सखल भागातही हे पाणी शिरल्याने परिसरात पर्जन्यस्थिती निर्माण झाली होती. मात्र पावसाचा जोर मंदारवल्यानंतर सकाळी पुराचे पाणी पूर्णपणे ओसरल्याने महाडकरांनी सुस्कारा सोडला.दरम्यान, सावित्री नदीच्या पातळीची वाढ कमी होत नसल्याने अद्यापही पुराचे सावट कायम आहे. रविवारी विसावा हॉटेलजवळ दोन वृक्ष उन्मळून पडल्यामुळे महाडपासून मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास खोळंबलेली होती. मार्गावर पडलेले वृक्ष महामार्ग विभागातर्फे बाजूला केल्यानंतर रात्री उशिरा हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शहरात प्लास्टिक कापड शाकारणीसाठी खरेदी करण्यासाठी कापड दुकानात झुंबड उडालेली दिसत आहे. (वार्ताहर)
पावसाचा जोर कमी; पुराचा धोका टळला
By admin | Updated: June 23, 2015 00:31 IST