Join us
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने केला कहर

By admin | Updated: September 1, 2014 05:04 IST

मुरुड शहरात दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप द्यायच्या वेळी सुरु झालेला पाऊस तब्बल २४ तास उलटले तरी थांबण्याचे नाव नाही.

मुरुड : मुरुड शहरात दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप द्यायच्या वेळी सुरु झालेला पाऊस तब्बल २४ तास उलटले तरी थांबण्याचे नाव नाही. रात्री पावसाने जोरदार सुरुवात करत मुरुड शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले. त्यामुळे मुरुड गोलबंगला ते जुनी पेठ या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. त्यातून गणपती उत्सवासाठी आलेल्या गणेश भक्तांना वाट काढताना खूप त्रास होत होता. काही मोटार सायकली पाण्यातून काढत असताना बंद पडल्याने ढकलत न्यावे लागले.शहरात अंजुमन हायस्कुल परिसरात, चिखल पाखाडी ते शिवानी मेडिकल, लक्ष्मी नारायण मंदिर ते सार्इं प्रसाद बेकारी आणि बाजारपेठ एस टी स्टँड परिसरात सकाळपर्यंत पाणीच पाणी पहावयास मिळत होते. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पहावयास मिळत होते. दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिल्यानंतर पावसाने प्रथम रिपरिप सुरू करून तो मुसळधार सुरू झाल्याने चाकरमान्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. आज सकाळपासून काही चाकरमानी मंडळींची मुंबापुरीला जाण्याची लगबग सुरू होती. अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यावरील वाहतूक धिम्या गतीने चालू होती. गणेशोत्सवासाठी फळे, फुले, भाजी विक्रेते, गौरीच्या पूजनास लागणारे सूप विक्रेते यांना पावसाचा फटका बसला. ग्राहकांची चक्क प्रतीक्षा करत बसावे लागले. एसटीचे वेळापत्रक कोलमडले होते. पावसाने विश्रांती न घेतल्याने चाकरमान्यांना गणपतीचे देखावे, आरास पाहण्यासाठी जाता आले नाही. उलट सक्तीने घरात बसावे लागले. नद्या, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत असून या पावसाचा सुपारी पिकाला धोका आहे.