Join us  

पावसाचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 5:39 AM

मुंबई उपनगराच्या तुलनेत शहरात अधिक सरी

मुंबई : मागील काही दिवसांपासून शनिवार-रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात कोसळून विश्रांतीवर गेलेल्या पावसाने शनिवारी मुंबईकरांसोबत लपंडाव खेळला. या वेळी उपनगराच्या तुलनेत शहरात पावसाच्या सरींचा वेग अधिक होता.मुंबई शहरात एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार सर कोसळत असतानाच उपनगर मात्र त्यातुलनेत कोरडे होते; आणि उपनगरात मुसळधार पावसाची सर कोसळत असतानाच शहरात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होत असल्याचे पाहायला मिळाले.पावसाची रिमझिम सुरू असतानाच येथील पडझडीच्या घटनांमध्येही वाढ होत असून, पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. शहरात चार, पूर्व उपनगरात एक अशा एकूण पाच ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.शहरात दोन, पश्चिम उपनगरात पाच अशा एकूण सात ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस रोडवरील ट्रान्सफॉर्म जिम येथे आग लागल्याची घटना घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास आग शमविण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.विदर्भात दोन दिवस मुसळधारबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, हे कमी दाबाचे क्षेत्र प्रतितास वीस किलोमीटर या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत आहे. तयार झालेल्या या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसह महाराष्ट्रातील विदर्भात २२ आणि २३ जुलै रोजी अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.२२ आणि २३ जुलै रोजी ओडिशा राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विदर्भ, पश्चिम बंगाल, तसेच झारखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. छत्तीसगडमध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी होईल. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. येथे ४५-५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलदेशाचा समुद्रकिनारा खवळलेला राहील. परिणामी, पुढील ४८ तासांसाठी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असेही आवाहन हवामान खात्याने केले.

टॅग्स :मुंबईपाऊस